
नाशिक कला कट्टा : शब्दमाधुर्य जपणाऱ्या प्रतिभावान गायिका | मधुरा मोघे- बेळे
"शास्त्रीय गायनातील सुरांचा उच्चार आणि सुगम गायनातील शब्दांचा उच्चार या दोन्हीही गोष्टी डोळसपणे हाताळणाऱ्या नाशिकच्या प्रतिभावान गायिका मधुरा मोघे बेळे. ‘सकाळ’च्या वाचकांशी संवाद साधताना त्या म्हणतात, की अनाहत नाद ऐकू येणे म्हणजेच ध्यानाची अंतिम अवस्था. तंबोऱ्यातून निघणाऱ्या ध्वनीशी एकरूप होणे, ही गायन शिकण्यातली पहिली अशी पायरी आहे, जी या अनाहत नादाकडे जाण्याचा साधकाचा मार्ग प्रशस्त करीत असते." - तृप्ती चावरे-तिजारे
(Nashik Kala Katta Madhura Moghe Bele interview by trupti tijare chavare nashik news)
जन्मतःच सुरेलपणाची देणगी लाभलेल्या मधुराताईंना संगीताची उत्तम जाण असणाऱ्या आई-वडिलांकडूनच गायनाचे बाळकडू मिळाले. नाशिकचे प्रसिद्ध गायन गुरु वाईकर गुरुजी यांच्याकडे त्यांनी गायनाचे अध्ययन सुरू केले. हे अध्ययन केवळ परीक्षेपुरते मर्यादित न राहता पुढे याची गायकी गाता आली पाहिजे, अशा खऱ्या कलाप्राप्तीच्या ध्येयाने विशारदपर्यंतचे शिक्षण सुरू होते.
त्यानंतर त्यांना नाशिकमधील प्रसिद्ध गायक व गुरू डॉ. अविराज तायडे यांच्याकडे शिकण्याचा योग आला. मुळातच सुरांचा पाया पक्का असल्यामुळे तेथे त्यांना परीक्षेच्या पलीकडे जाऊन तालमीचे गाणे मैफलीत कसे मांडायचे ते शिकायला मिळाले. याचदरम्यान नाशिकमधील थोर गायिका, संस्कार भारतीच्या आधारस्तंभ कुमुदताई अभ्यंकर यांचीही त्यांना सुगम संगीतातील शब्दप्रधान गायकीची तालीम मिळाली.
अतिशय शिस्तप्रिय शिक्षिका, लेखिका, संगीतकार, दिग्दर्शक, असे आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या कुमुदताई त्या वेळी महाराष्ट्रातल्या एक अग्रगण्य गायिका होत्या. त्या काळातील त्यांची संगीत क्षेत्रातील कामगिरी भरीव आणि मोठी होती. त्यामुळे अनेक संगीतकारांच्या व गायकांच्या सहवासाने, भावसंगीतातला त्यांचा अनुभव फार वरच्या दर्जाचा होता.
हेही वाचा : ही चाळीस वर्षे जुनी बलाढ्य बँक ४८ तासात बुडालीच कशी?
मधुराताईंनी त्यांच्या या अनुभवातून, सुगम संगीतातले अनेक बारकावे आत्मसात केले. ज्येष्ठ गायिका अलकाताई मारूलकर आणि देवकी पंडित यांचाही त्यांना सहवास लाभला, त्यातून त्यांना अभिजात गायनातील रससौंदर्याचा अर्थ समजू लागला.
गायनाची शैली ही शास्त्रीय असो किंवा सुगम, सारेगमपचा आधार हा एकच असतो, हे ओळखून त्यांनी या दोन्हीही शैलींचा संतुलित अभ्यास केला. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या गुरुजनांचा वाटा फार मोलाचा आहे, असे त्या मानतात. घरातील आईचे गाणे किंवा मोठ्या कलाकारांचे गाणे त्यांनी डोळसपणे ऐकले. नुसतीच शब्दामधली भावना प्रगट करणे वेगळे आणि प्रत्यक्ष ते शब्दरूप होणे वेगळे.
याबाबत, पद्मजाताई फेणाणींचे शब्दरूप प्रगट करण्याचे कौशल्य त्यांना विशेष भावले. सुगम संगीत रचनेतील प्रत्येक क्षण हा सुरांच्या मजकुराने लतादीदी आणि आशाताई कसा भरून काढतात, याचे निरीक्षण करून त्यातील सौंदर्य आपल्या गळ्यातून कसे निघेल, याचा त्यांनी विचार केला. या विचारातूनच त्यांना संगीतरचनेचा एक नवा सूर गवसू लागला आणि त्यातून पंढरीच्या वाटेवरी या त्यांच्या अल्बमचा जन्म झाला.
प्रसिद्ध संवादिनी वादक अजय जोगळेकर यांचे संगीत संयोजन लाभलेल्या यातील सर्वांगसुंदर संगीतरचना प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि शंकर महादेवन यांनी गायल्या आहेत, तर थोर संवादिनी वादक (स्व.) पं. तुळशीदास बोरकर यांनी पायपेटीची प्रासादिक साथसंगत केली आहे. आजकालच्या वातावरणात साधनेबरोबरच शास्त्र, कला आणि तंत्र या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले तरच संगीतकला ही लोकाभिमुख राहील, असे त्यांचे मत आहे.
'भूप, देसकार आणि शुद्ध कल्याण या रागांचे आरोह सारखे, हे शास्त्र सांगते, परंतु या रागांची ‘कला’ म्हणून उकल करताना ही तीन वेगवेगळी व्यक्तिमत्त्व कशी आहेत, याचे प्रात्यक्षिक मधुराताई गाऊन दाखवतात तेव्हा तीन वेगवेगळ्या प्रवाहांची रूपे अनुभवास येतात. नाशिकमधील कलाकारांना हक्काचा रंगमंच मिळावा, तसेच नवीन पिढीवर संगीताचे व संस्कृत श्लोकांचे संस्कार रुजावेत यासाठी मधुराताईंनी ईशान म्युझिक ॲकॅडमीची स्थापना केली.
नवीन पिढीचा मेंदू विकसित आहेच, परंतु त्यांचे मनही विकसित व्हावे, यासाठी मधुराताई एका वेगळ्या उंचीवरून विचार करतात. बालपणापासून हाती घेतलेला गायनाचा वसा मधुराताईंनी उत्तरोत्तर प्रगल्भ करीत नेला आहे हे त्यांच्या गायनातून दिसते.
एकेका सुरामध्ये रममाण होताना, तंबोऱ्यातून निघणारी अनंत ध्वनीकंपने, त्यांच्याच गळ्यातून निघणाऱ्या श्रुतीमधुर सुरात विलीन होऊ लागतात आणि वर्तमानकाळही जिथे विसरायला होतो, अशा एका उच्च अवस्थेशी त्यांचा प्रवाही संवाद सुरू होतो.