Nashik: कर्मचाऱ्याच्या मारहाणीने बाळाचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

baby
कर्मचाऱ्याच्या मारहाणीने बाळाचा मृत्यु

नाशिक : कर्मचाऱ्याच्या मारहाणीने बाळाचा मृत्यु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक : जिल्हा रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्याने प्रसूत महिलेला मारहाण केल्याने तिच्या बाळाचा मृत्यू झाल्याची तक्रार पीडित मातेच्या कुटुंबाने पोलिस आणि जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली. या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरु केली. दरम्यान, आज संबधित आरोग्य कर्मचाऱ्यावरील कारवाईच्या मागणीसाठी तब्बल आठ तास बाळाचा मृतदेह तसाच पडून होता.

यानिमित्ताने, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या दादागिरीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी (ता.९) पेठ येथून पहाटे चारला ही महिला प्रसूतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली होती. पोटात कळा सुरु झाल्यानंतर ती स्वच्छतागृहात जात असतांना सफाई कर्मचाऱ्याने तिला अडविले. वादानंतर तिला शिवीगाळ करीत भिंतीवर ढकलले. त्यामुळे ती खाली पडून पोटाला मार लागला. त्यानंतर दोन दिवसांनी सकाळी प्रसूती झाल्यानंतर डॉक्टरही उपस्थित नव्हते. अशा हलगर्जीपणामुळे बाळाच्या डोक्याला मार लागला.

त्यातच बाळाचा मृत्यु झाला असा पीडित महिलेचा व तिच्या कुटुंबाचा आरोप आहे. पिडीत मातेच्या कुटुंबाने यासंदर्भात बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना तसेच पोलिसांकडे तक्रार दिली आहे. याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

संबंधितांवर कारवाई करा : श्रमजीवी संघटना

वाडीवऱ्हे : प्रसूतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल महिलेस अमानुष मारहाण केल्याने बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कर्मचाऱ्यावर व बाळंतपणावेळी गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर करवाई करावी, अशी मागणी श्रमजीवी संघटनेचे नाशिक तालुकाध्यक्ष अर्जुन भोई, कैलास गारे, अरुण चौधरी, प्रदीप माळेकर, किसन देशमुख यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे केली आहे.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

प्रसूतीदरम्यान बाळ जोरात खाली पडले आणि त्याच्या डोक्याला जोरात मार लागला. मातेला कर्मचाऱ्यांनी मारहाण केली. ग्रामीण भागातील आदिवासी गरीब, कष्टकरी रुग्णांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी यावे की नाही, असा प्रश्न उपस्थित करीत चौकशीची मागणी केली आहे.

-हिरा गारे, पीडित, पेठ, जि. नाशिक

संबंधित प्रकारात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दोन दिवसांत चौकशीचा अहवाल येईल. चौकशी अहवाल आल्यानंतर त्याविषयी कारवाई केली जाईल.

-डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

loading image
go to top