esakal | लोकसंख्येची घनता असलेल्या विभागात अधिक प्रभाग
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik

लोकसंख्येची घनता असलेल्या विभागात अधिक प्रभाग

sakal_logo
By
विक्रांत मते - सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक महापालिका कार्यक्षेत्रात त्रिसदस्यीय रचनेनुसार पुढील पंधरा दिवसात ४१ प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार होणार आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या आधारेच नवीन प्रभागरचना तयार झाल्यास सर्वाधिक प्रभाग प्रत्येकी ८ इतके पंचवटी, नाशिक रोड, सिडकोत होण्याची शक्यता आहे.

राज्यात नाशिकसह अठरा महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षाच्या सुरवातीला होणार आहे. निवडणुकांसाठी त्रिसदस्यीय प्रभाग रचना राहणार असून, रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. पंधरा दिवसात राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर केला जाणार आहे. सन २०११ च्या जनगणनेच्या आधारे प्रभागांची रचना केली जाणार आहे. शहरात १४ लाख ९० हजार ५३ लोकसंख्येचे दोन हजार ८०७ प्रगणक गट तयार केले जाणार आहे. साधारण ७० प्रगणक गट तयार करून एक प्रभाग तयार होईल. त्रिसदस्यीय रचनेनुसार तीन नगरसेवकांचे चाळीस, तर दोन नगरसेवकांचा एक असे एकूण ४१ प्रभाग तयार होतील. सन २०१७ च्या निवडणुकीत चार सदस्यांचे प्रभाग असल्याने त्याअनुषंगाने प्रभागांची संख्या ३१ होती. यात २९ प्रभाग चार नगरसेवकांचे, तर दोन प्रभाग तीन नगरसेवकांचे होते. आता एका प्रभागात तीन सदस्य असल्याने दहाने प्रभाग वाढणार आहे. त्याशिवाय लोकसंख्या हा घटक प्रभाग रचनेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याने लोकसंख्येची घनता ज्या भागात अधिक आहे. त्या भागात अधिक प्रभाग होतील. पूर्व, पंचवटी, नाशिक रोड व सिडको विभागात लोकसंख्येची घनता अधिक असल्याने या विभागांमध्ये प्रभाग वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा: पिंपरी : महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनेच होणार

सन २०१७ च्या प्रभागरचनेत पंचवटी विभागात सहा प्रभागात एकूण चोवीस नगरसेवक होते. आता नगरसेवकांची संख्या पूर्वीप्रमाणे म्हणजेच चोवीस राहणार असली तरी प्रभागांची संख्या सहाऐवजी आठ होईल. पश्चिम विभागात पूर्वी तीन प्रभाग होते. आता एकूण बारा नगरसेवकांचे चार प्रभाग होतील. सातपूर विभागात पूर्वी पाच प्रभाग होते. सिडकोतील प्रभाग क्रमांक २६ हा सातपूर विभागाला जोडला गेला होता. नव्या रचनेत सातपूरला जोडला गेलेला भाग पुन्हा सिडकोकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने सातपूरमध्ये सात प्रभाग राहण्याची शक्यता आहे. सिडकोत पूर्वी सहा प्रभाग होते. यापूर्वी सातपूर विभागाला जोडला गेलेला भाग सिडकोत जोडला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंदिरानगरच्या बाजूने भाग तोडून तो पूर्व विभागाला जोडला जाण्याची शक्यता आहे. सिडकोत आठ प्रभागांची शक्यता आहे. पूर्व विभागाचा भाग सिडकोला न जोडल्यास नगरसेवकांची संख्या वाढेल. त्यातून दोन सदस्यांचा प्रभाग सिडकोत अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. पूर्व विभागाचा काही भाग नाशिक रोडला जोडल्यास आठ प्रभागांची शक्यता आहे. पूर्व विभागात सात प्रभागांची शक्यता आहे.

हेही वाचा: नागपूर विद्यापीठात ना प्र-कुलगुरू ना अधिष्ठाता!

रचनेत बदल

पंचवटीत सहाऐवजी आठ, पश्‍चिम विभागात तीनऐवजी चार, सातपूर विभागात पाचऐवजी सात, सिडको विभागात सहाऐवजी आठ, पूर्व विभागात पाचऐवजी सहा, तर नाशिक रोड विभागात सहाऐवजी आठ प्रभाग होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top