‘नमामि गोदा’साठी आयुक्तांकडून समिती

सल्लागार होण्यासाठी सात अर्ज; छाननी सुरू
Godavari river nashik
Godavari river nashiksakal

नाशिक : केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या १८२३ कोटींच्या निधीतून नमामि गोदा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. २०२७ मध्ये नाशिकला कुंभमेळा होणार असून, तोपर्यंत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

दरम्यान, महापालिकेतर्फे नमामि गोदा प्रकल्पासाठी सल्लागार नेमणुकीची प्रक्रिया सुरू असून, यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी महापालिकेतील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष समिती नेमली आहे. समितीत आलेल्या सात प्रस्तावांची छाननी सुरू आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून प्रसिद्ध नाशिकच्या पवित्र गोदावरी आगामी कुंभमेळ्यापूर्वी प्रदूषणमुक्त करून त्याच्यातून स्वच्छ पाणी वाहण्यासाठी भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी नमामि गोदा प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भाजपच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय जलमंत्री गजेंद्रसिंग शेखावत आदींना साकडे घातले होते. गजेंद्रसिंग शेखावत यांनी माजी महापौर कुलकर्णी यांच्या मागणीला साथ देत महापालिका प्रशासनाने याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. पण प्रशासनाच्या संथ कारभारामुळे याबाबतचा डीपीआर वेळेत सादर होऊ शकला नाही. त्यानंतर प्रशासक राजवट लागण्याच्या एक दिवसाअगोदर आडगाव या भागात लॉजिस्टिक पार्क व बहुचर्चित नमामि गोदा प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करून नाशिककरांना हे गिफ्ट दिल्याचे सांगितले होते.

दरम्यान, सध्या महापालिकेत प्रशासक राजवट सुरू आहे, तर आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नमामि गोदा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासन कामाला लागली आहे. प्रकल्पाच्या संपूर्ण नियोजनासाठी महापालिका सल्लागार नेमणूक करणार आहे. यासाठी दोन वेळा जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पहिल्यावेळी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर सात इच्छुकांनी आवेदन सादर केले. त्यांची छाननी झाल्यानंतर सातपैकी सहा कंपन्या अपात्र ठरविल्या होत्या, तर एकच कंपनी पात्र ठरविली होती. मात्र, स्पर्धा करण्यासाठी कमीत कमी तीन कंपन्यांचे प्रस्ताव महापालिकेला हवे असल्यामुळे पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येऊन १३ एप्रिलपर्यंत आवेदन घेण्यात आले. या काळात महापालिकेला पुन्हा एकूण सात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

३,५०० पानांचे प्रस्ताव

नमामि गोदा प्रकल्पाच्या सल्लागार होण्यासाठी सध्या नाशिक महापालिकेकडे एकूण सात कंपन्यांनी आपले प्रस्ताव सादर केले आहे. एका कंपनीचा प्रस्ताव सुमारे पाचशे पानांचा असून, एकूण सुमारे साडेतीन हजार पानांचे प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून, आलेल्या प्रस्तावांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. कंपनीने यापूर्वी कुठे काम केले आहे व कोणत्या दर्जाचे काम केले आहे, यापासून आपले काम कसे पद्धतीने करणार यापर्यंत सर्व बाजू तपासण्यात येत आहेत. यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासन रमेश पवार यांनी शहर अभियंता शिवकुमार बंजारी यांच्यासह एकूण चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली असून, ही समिती सध्या ‘नमामि’साठी आलेल्या प्रस्तावांची छाननी करीत आहे. सुमारे एक महिन्याचा कालावधी या संपूर्ण प्रक्रियेसाठी लागणार असून, यानंतर आर्थिक बीड ओपन करून सल्लागाराची नेमणूक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com