Latest Marathi News | ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News

Nashik : ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्‍यकच : पोलीस आयुक्त

नाशिक : शहराच्या अतिसंवेदनशिल परिसरात अनोळखी ड्रोनने केलेल्या घुसखोरीप्रकरणाचा सुगावा दोन महिन्यांनंतरही लागू शकलेला नाही. मात्र, यामुळे पोलिस आयुक्तांनी ड्रोनचालक-मालकांवर कठोर निर्बंध लादत ड्रोन पोलीस ठाण्यांमध्ये जमा केले होते. यासंदर्भातील निर्बंध पोलीस आयुक्तांनी हटविल्याने ड्रोनचालक-मालकांना दिलासा मिळाला असला तरी, आगामी लग्नसराई असो कोणत्याही ठिकाणी ड्रोन उडविण्यासाठी पोलिसांची परवानगी मात्र बंधनकारक असणार आहे. (Nashik Police Commissioner statement regarding Permission required for drone flights Nashik Latest Marathi News)

शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गेल्या ३० सप्टेंबर रोजी अधिसूचना काढून कोणत्याही कार्यक्रमांमध्ये ड्रोनचा वापर करण्यापूर्वी पोलीस परवानगी बंधनकारक करतानाच, ड्रोनचालका-मालकांनी त्यांच्याकडील ड्रोन हे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये जमा करण्याचे आदेश बजावले होते. महिनाभरापूर्वी, पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या अतिसंवेदनशील परिसर गांधीनगर येथील लष्करीची हद्द आणि आडगाव शिवारातील डीआरडीओ या दोन ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात ड्रोनचे घुसखोरी केली होती याप्रकरणी उपनगर आणि आडगाव पोलिसात गुन्हेही दाखल आहेत.

परंतु, दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही याप्रकरणाची उकल होऊ शकलेली नाही. त्यामुळे असा प्रकार होऊ नये, तसेच ड्रोनचालक-मालकांनाही नियमांची माहिती व्हावी या हेतूने पोलीस आयुक्तांनी शहरात ड्रोन उडविण्यावर निर्बंध घातले होते. या निर्बंधांची मुदत दोन दिवसांपूर्वीच संपली आहे. या अधिसूचनेला पोलीस आयुक्तांनी वाढ दिलेली नाही.

यामुळे, ड्रोनचालक-मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांमध्ये विवाह समारंभांना प्रारंभ होणार असल्याने ड्रोन पोलिसांच्या ताब्यात होते. त्यामुळे ड्रोनचालक-मालकांसमोर मोठा प्रश्‍न उभा राहिला होता. पोलीस आयुक्तांनी ड्रोन जमा करण्यासंदर्भात शिथिलता बाळगत दिलासा दिला असला तरी, कोणत्याही कार्यक्रमांसाठी ड्रोन उडविण्यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्यांची परवानगी बंधनकारक असणार असल्याचे आयुक्त नाईकनवरे यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: Nashik : घर सोडून गेलेल्यांची पोलिसांमुळे ‘घरवापसी’

तपास सुरुच

जिल्ह्यात लष्करीचे तळ असल्याने अतिसंवेदनशील क्षेत्र आहेत. शहरात १६ ठिकाणी ‘नो फ्लाइंग झोन’ आहेत. मात्र, कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल (कॅट्स) तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) क्षेत्रात अज्ञात ड्रोन घुसखोरीच्या घटना घडल्या. त्याची गंभीर दखल पोलिस आयुक्तांनी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लष्करी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तज्ज्ञांची मदत घेत सदरील ड्रोन कोणाचे, त्यांचा उद्देश काय याचा तपास अद्यापही सुरुच आहे.

"शहरात किती ड्रोन-मालक आहेत. त्यांची नोंदणी होणे आवश्‍यक होते. त्यांच्याकडील ड्रोनची कंपनी व त्यांची रेंज याची संपूर्ण तांत्रिक माहिती शहर पोलिसांनी अद्ययावत केली आहे. त्यामुळे आता संबंधित ड्रोन मालकांनी पोलिस ठाण्यात अर्ज करुन आपापले जमा केलेले ड्रोन परत घेऊन जावेत. मात्र, ड्रोनचा समारंभांमध्ये वापर करण्यापूर्वी संबंधित पोलिस ठाण्यात अर्ज करुन परवानगी घेणे बंधनकारक असेल." - जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त, नाशिक.

हेही वाचा: Nashik Crime News : उभ्या ट्रकमधून दीड लाखांचा माल लांबवला