esakal | नाशिकचा उन्हाळ कांदा खाणार सलग तिसऱ्या वर्षी ‘भाव'! देशांतर्गत व्यापाऱ्यांचा खरेदीकडे वाढता कल
sakal

बोलून बातमी शोधा

nashik onion

नाशिकचा उन्हाळ कांदा खाणार सलग तिसऱ्या वर्षी ‘भाव'!

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : राज्यात जुलै-ऑगस्टमध्ये वरुणराजा धो-धो बरसणार, याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी यापूर्वीच वर्तविला आहे. या अंदाजाच्या अनुषंगाने यंदा सलग तिसऱ्या वर्षी नाशिकचा उन्हाळ कांदा ‘भाव’ खाणार (nashik summer onion) असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दक्षिण कर्नाटकमधून ऑगस्टच्या मध्याला बाजारात येणाऱ्या कांद्याचे गेल्या दोन वर्षांमध्ये नुकसान झाल्याने नाशिकच्या कांद्याला चांगला भाव मिळाला होता. याच पार्श्‍वभूमीवर कांद्याच्या आगारात उन्हाळ साठवणुकीकडील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या पंजाब, दिल्लीच्या व्यापाऱ्यांनीही उन्हाळ कांद्याची साठवणूक सुरू केली आहे. (nashik-summer-onion-on-demand-marathi-news)

गुजरातचा आणि पश्‍चिम बंगालमधील कांदा संपण्याच्या टप्प्यात

गुजरातचा आणि पश्‍चिम बंगालमधील कांदा संपण्याच्या टप्प्यात पोचला आहे. राजस्थानमध्ये नवीन कांद्याची आवक सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाउनमुळे मध्य प्रदेशातील कांद्याच्या आगारातील बाजारपेठा बंद होत्या. परिणामी, मध्य प्रदेशातील बाजारपेठांमधील लिलाव बंद असताना देशांतर्गत व्यापाऱ्यांचा कल नाशिकचा कांदा खरेदी करण्याकडे राहिला. मंगळवार (ता. १)पासून मध्य प्रदेशात लिलाव सुरू होतील. ही जरी एकीकडे परिस्थिती असली, तरीही बिहार, उत्तर प्रदेशप्रमाणे पश्‍चिम बंगालमध्ये नाशिकच्या कांद्याला चांगली मागणी आहे. शिवाय बांगलादेशच्या ग्राहकांची मागणी राहिली. त्यामुळे दिवसाला बांगलादेशच्या सीमेवर शंभर ते दीडशे ट्रक उभे राहत होते.

कांद्याच्या भावात वाढ

जिल्ह्यातील बाजारपेठांमधील कांद्याच्या भावात लॉकडाउनमधील निर्बंध उठल्यानंतर लिलाव सुरू झाल्यापासून कांद्याच्या भावात वाढ होत असल्याचे दिसत आहे. सरासरी एक हजार ३०० रुपये क्विंटल या भावाने कांद्याची विक्री सुरू झाली होती. आज पिंपळगाव बाजार समितीत एक हजार ८५१, तर लासलगावमध्ये एक हजार ८५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने कांद्याची विक्री झाली आहे.

निर्यात १५ टक्क्यांपर्यंत

देशांतर्गत कांद्याची मागणी असताना दुसरीकडे निर्यातीसाठी सर्वसाधारणपणे १५ टक्के उन्हाळ कांदा व्यापारी पाठवताहेत. भारतीय कांदा श्रीलंकेत टनाला ४००, सिंगापूरमध्ये ४५०, तर लंडनमध्ये ४८० डॉलर भावाने विकला जात आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतात यंदा २० ते २५ टक्क्यांनी उत्पादन वाढले आहे. हा कांदा जुलैच्या मध्यापर्यंत निर्यातीसाठी पाठविला जाईल. सद्यःस्थितीत अरब राष्ट्रांमध्ये भारतापेक्षा किलोला नऊ ते दहा रुपयांनी स्वस्त कांदा मिळत असल्याने पाकिस्तानच्या कांद्याला पसंती मिळत आहे. पाकिस्तानच्या कांद्याच्या निर्यातीचा भाव टनाला २८० डॉलर इतका आहे.

हेही वाचा: 'ते' लग्न इगतपुरीच्या रिसॉर्टला पडले महागात!

उन्हाळ कांद्याच्या भावाची स्थिती

(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये)

बाजारपेठ शनिवार (ता. २९ मे)

मुंबई- एक हजार ७५० एक हजार ७५०

येवला -एक हजार ६०० एक हजार ४५०

लासलगाव -एक हजार ८५० एक हजार ६५१

मुंगसे -एक हजार ६०५ एक हजार ५५०

पिंपळगाव -एक हजार ८५१ एक हजार ५७१

हेही वाचा: महापालिका काढणार तीनशे कोटींचे कर्ज; महापौरांची घोषणा

loading image
go to top