
रुग्णालय, शाळा अन् हजेरी शेड रडारवर
नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार लवकरच रुग्णालयासह विविध भागात सरप्राईज व्हिजिट देत प्रशासन अधिक गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची तयारी सुरू केली असून, डॉक्टर, शिक्षक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या याद्या आणि त्यांच्या ड्यूटीची माहिती संकलनाला सुरवात केली आहे. आयुक्त स्वतः कामकाज स्थळांना भेटी देऊन संबंधित अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत का, याची खातरजमा करणार आहे.
महापालिका आयुक्तांकडून सुरू करण्यात येणाऱ्या या सरप्राईज व्हिजिटच्या धसक्याने आठवडाभर आधीपासूनच महापालिकेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. विविध विभागांनी कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना त्यांच्यावरील जबाबदारीची जाणीव करून देत, पूर्व तयारी सुरू केली आहे.
महापालिकेच्या कामकाजाच्या अनुषंगाने सामान्यांच्या सर्वाधिक तक्रारी रुग्णालयात डॉक्टर भेटत नाही, सफाई कर्मचारी नियमित येत नाही आणि त्यानंतर शाळेतील शिक्षणाविषयी आहे. शहरातील रोज हजारो नागरिकांशी या तीन घटकांचा सबंध येतो. किंबहुना महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाची प्रतिमाच या तीन घटकांच्या कार्यक्षमतेवरून ठरविली जाते.
महापालिका रुग्णालयातील कामकाज चांगले नसल्यास महापालिका बदनाम होते. रस्ते स्वच्छ होत नसल्यास बाहेरगावहून येणाऱ्या नागरिकांत नाशिकची चुकीची प्रतिमा जाते. त्यामुळे सामन्यांमध्ये महापालिकेविषयी प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी महापालिका आयुक्त सरसावले आहे. त्यासाठी आयुक्तांनी लवकरच सरप्राईज व्हिजिटच उपक्रम सुरू करणार असल्याची पूर्वकल्पना देत तिन्ही विभाग प्रमुखांकडून कर्मचाऱ्यांची माहिती मागविली आहे.
कामचुकारीला ब्रेक
महापालिकेत बहुतांश लोक कामकाज करीत असले तरी त्यातील काही मोजक्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेची प्रतिमा खराब होऊ नये, अशी आयुक्त रमेश पवार यांची या उपक्रमामागची भूमिका आहे. त्यासाठी सगळ्या विभागांना पूर्व कल्पना देऊन ते सरप्राईज व्हिजिट सुरू करणार आहे. पूर्वकल्पना देऊनही प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र महापालिका प्रशासनाकडून कारवाया सुरू होणार असल्याने हजेरीपटाप्रमाणे कर्मचाऱ्यांना सक्रिय राहावे लागणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या ड्यूटी, त्यांचे ठिकाण, कामाच्या वेळा या सगळ्याविषयी माहिती आयुक्तांनी स्वतःकडे मागविली आहे.
शाळा, रुग्णालये तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडला अचानकपणे भेट देणार आहेत. अशा भेटीच्या वेळेस गैरहजर कर्मचाऱ्यांबाबत रजेवर असल्याचे कारण पुढे केले जाते. त्यामुळे यापुढे जो कर्मचारी गैरहजर असेल आणि तो रजेवर असल्याचे कारण असेल तर त्याने आपल्या विभागप्रमुखांकडून रीतसर अर्ज करून त्यास मंजुरी घेतली आहे की नाही, याची तपासणीदेखील करण्यात येणार आहे.
- रमेश पवार, आयुक्त, महापालिका
Web Title: Nashik Surprise Visit Program Muncipal Commissioner Hospital School Progress
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..