Nashik : झाडे लावा अन्‌ मिळवा अतिरिक्त गुण; मुक्त विद्यापीठाची योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

YCMOU

नाशिक : झाडे लावा अन्‌ मिळवा अतिरिक्त गुण; मुक्त विद्यापीठाची योजना

नाशिक : येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे या शैक्षणिक वर्षापासून  ‘एक विद्यार्थी एक झाड’  हा  पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येईल. उपक्रमातंर्गत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्याला  लागवडीपासून सहा महिने कालावधीसाठी एका वृक्षाची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. वर्षाच्या शेवटी त्याला या उपक्रमासाठी अतिरिक्त गुण दिले जाणार आहेत. या उपक्रमास  ‘वायओएसओटी’ (YCMOU One Student One Tree)  असे नाव देण्यात आले आहे. संकेतस्थळावर याच नावाने माहिती उपलब्ध आहे.

मुक्त विद्यापीठात दरवर्षी साडेपाच लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे दरवर्षी राज्यात पाच ते साडेपाच लाख झाडे लावली जावीत, असा उद्देश उपक्रमाचा आहे. किमान एक वर्ष कालावधी असणाऱ्या शिक्षणक्रमाला प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊ शकतील. उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध यादीपैकी प्रत्येकी एका वृक्षाची लागवड करायची आहे. विद्यापीठाने प्रकल्पासाठी  विशेष  मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे  ॲप आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा: मालेगाव : चरस, दुचाकीसह पावणेदोन लाखांचा ऐवज जप्त; तिघांना अटक

विद्यार्थी गुगल प्ले स्टोअरवरून YOSO ॲप डाऊनलोड करू शकतील. ‍‌ ॲपवर विद्यार्थी लागवडीचे छायाचित्र अपलोड करतील. छायाचित्रासह वृक्षलागवडीच्या स्थळाची आपोआप नोंद होईल. त्यासाठी जी.पी.एस. प्रणालीचा वापर केला जाईल. विद्यार्थी त्याने लागवड केलेल्या वृक्षाची जोपासना करेल आणि संगोपनाचा पुरावा, म्हणून तो दर महिन्यास विशिष्ट तारखेपूर्वी लागवड केलेल्या वृक्षाचे छायाचित्र अपलोड करेल.

वर्षभरात विद्यार्थ्याला या रोपट्याच्या वाढीची किमान चार छायाचित्रे विद्यापीठाने दिलेल्या तारखेपूर्वी अपलोड करायची आहेत. सलग सहा महिने जोपासना करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याच्या अंतिम परीक्षेच्या गुणांमध्ये एक वर्ष कालावधीच्या शिक्षणक्रमाला दहा गुण, तर पदवी परीक्षेच्या तीन वर्षांसाठी एकूण २५ प्रोत्साहन गुण दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou.ac.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. उपक्रमाची मूळ संकल्पना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांची आहे.

पर्यावरणातील घटकांचा वापर मानवाने आपल्याबरोबर इतर सजीव घटकांचा विचार करून केल्यास पर्यावरणाचा समतोल बिघडणार नाही. भविष्यातील पर्यावरणविषयक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. मुक्त विद्यापीठाच्या ‘एक विद्यार्थी एक झाड’ या योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी आत्मियता वाढेल आणि महाराष्ट्राचे हरितकवच वृध्दिंगत होण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरू प्रा. ई वायुनंदन यांनी व्यक्त केला.

कार्यशाळेचा समारोप

कोरोनासारख्या जागतिक संकटात तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. विद्यापीठ, महाविद्यालय अशा संस्था आणि विद्यार्थी यांचा संवाद वाढला आहे. भविष्यात या तंत्रज्ञानामुळे शिक्षणक्षेत्रात अनेक बदल करावे लागतील, असे प्रतिपादन मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू वायुनंदन यांनी केले. मुक्त विद्यापीठ आणि हरियाना केंद्रीय विद्यापीठातर्फे ‘संशोधनातील नीतीमूल्ये’ या विषयावर सात दिवसांची ऑनलाईन कार्यशाळा झाली. समारोप सत्रात प्रा. वायूनंदन बोलत होते. केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तानकेश्‍वर कुमार या वेळी उपस्थित होते. शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे.

हेही वाचा: अकोला : पाणीच पाणी चोहीकडे, हरभरा पेरावा सांगा कुठे?

परीक्षा, संशोधन आणि प्रत्यक्ष शिकवणे यासारख्या सर्वच बाबींमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. मात्र, हे सर्व करताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नीतीमूल्यांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. तानकेश्‍वर कुमार यांनी सांगितले. केंद्रीय विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सारीतका शर्मा यांनी प्रास्तविक केले. मुक्त विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालक डॉ. कविता साळुंके यांनी अहवाल वाचन केले. श्वेता जाधव यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल डॉ. संतोष सी. एच. यांनी आभार मानले.

Web Title: Nashik Ycmou Program Plantation Tree Get Marks

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..