Akola: पाणीच पाणी चोहीकडे, हरभरा पेरावा सांगा कुठे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतात पाणी साचले

अकोला : पाणीच पाणी चोहीकडे, हरभरा पेरावा सांगा कुठे?

तेल्हारा (जि. अकोला) : तालुक्यातील दापुरा हणवाडी शेत शिवारात गेले जून महिन्यांपासून कपाशी लागवड केलेल्या वीस एकर क्षेत्राला तलावाचे स्वरुप आले आहे. संपूर्ण शेतात पाणी साचले असल्यामुळे शेतकऱ्यांचे मनोबल खचले आहे. खरीपातील पीक पाण्यात बुडाल्यानंतर रब्बीतील हरभरा पेरणी करावी, तर अद्यापही शेतात पाणी साचले असल्यामुळे रब्बीचे पीक कुठे घ्यावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हान येथिल शेतकरी माजी सरपंच सादिक भाई व मंगेश रोठे यांचे हणवाडी शिवारात शेती आहे. शेताचे समोरच्या बाजूला शेगाव-आरसुळ-देवरी या मार्गाचे नुकतेच बांधकाम झाले. मात्र नियोजन शून्य कामामुळे या मार्गा लगतची शेती ही पडिक होण्याच्या मार्गावर आहे. शेतातील पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने शेताचे यंदाच्या पावसाळ्यात तळे झाले आहे.

हेही वाचा: सोलापूर : कचरा न देणाऱ्या नागरिकांवर होणार आता दंडात्मक कारवाई

शेतकरी सादिक भाई यांनी जून महिन्यात पूर्ण क्षेत्रात कपाशी लागवड केली होती. पाऊस आल्याने संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले. परिणामी त्यांनी लागवड केलेली कपाशी या पाण्याने सडली. सुरुवातीला पाण कमी असल्याने मूग पेरणी केली. मात्र, पाऊस आला आणि संपूर्ण शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे मुगाचे पीकही गेले. खरीप पाण्यात गेल्याने रब्बीत तरी शेतात पेरणी करावी हा विचार केला तर शेताचे पार तळे झाले आहे. आणखी एक-दोन महिने शेतातील पाणी कमी होईल व जमिनीची झालेली दलदल कमी होईल, अशी अपेक्षा नाही. त्यामुळे रब्बीतील पीकंह घेणे कठीण झाले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे हात वर

नवीन रस्ता बांधताना नियोजन शून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेताचे तळ झाले असल्याने शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दार ठोठावले. मात्र मुग गिळून बसलेल्या अभियंत्यांना शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठीही वेळ मिळत नाही. एकीकडे सरकार शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. दुसरीकडे शासकीय यंत्रणा शेतकऱ्यांना संकटात सोडून हात वर करताना दिसत आहे.

हेही वाचा: अकोला : पत्नीला लाकडाने बेदम मारहाण करून तोडले हात-पाय

पालकमंत्र्यांपुढे मांडणार व्यथा

शेतकऱ्यांचे कुटुंब शेतीवरच अवलंबून असते. शेती पिकली नाही तर उदरनिर्वाह कसा चालवावा? बॅंकांचे कर्ज कसे फेडावे? असे प्रश्न शेतकऱ्यांना भेडावसत आहे. शासकीय यंत्रणा जुमानत नसल्याने नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आता त्यांची व्यथा पालकमंत्री बच्चू कडू यांच्याकडे मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :AkolaFarmer