esakal | दिवाळीत शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’! नवीन कांद्याच्या गुणवत्ताअभावामुळे नाशिकच्या उन्हाळ कांद्याला ‘भाव’ 
sakal

बोलून बातमी शोधा

onion price 3.jpg

कांद्याची निर्यातबंदी, साठवणुकीवर मर्यादा यातूनही नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण झाली नाही. केंद्र सरकारने पुढे कांद्याच्या आयातीवर भर दिला. इराण, तुर्कस्तानचा कांदा जिल्ह्यातील आगारात पोचल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली

दिवाळीत शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’! नवीन कांद्याच्या गुणवत्ताअभावामुळे नाशिकच्या उन्हाळ कांद्याला ‘भाव’ 

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कांद्याची निर्यातबंदी, साठवणुकीवर मर्यादा यातूनही नाशिकच्या उन्हाळ कांद्याच्या भावात घसरण झाली नाही. केंद्र सरकारने पुढे कांद्याच्या आयातीवर भर दिला. इराण, तुर्कस्तानचा कांदा जिल्ह्यातील आगारात पोचल्याने उन्हाळ कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. पण राजस्थानप्रमाणे नव्याने आवक सुरू झालेला लाल कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पोचेपर्यंत ३० ते ४० टक्के खराब होऊ लागला आहे. त्यामुळे नाशिकच्या उन्हाळ कांद्याने पुन्हा ‘भाव’ खाण्यास सुरवात केली. सोमवारी (ता.९) सर्वाधिक चार हजार ९५१ रुपये क्विंटल या सरासरी भावाने पिंपळगावमध्ये उन्हाळ कांद्याची विक्री झाली. 

राजस्थानप्रमाणे नव्या कांद्याच्या गुणवत्ताअभावामुळे उन्हाळ कांद्याला ‘भाव’ 
उन्हाळ कांद्याला क्विटंलला सरासरी मुंगसेमध्ये चार हजार १००, कळवणमध्ये चार हजार २००, चांदवड, लासलगाव आणि देवळ्यात प्रत्येक ठिकाणी चार हजार ३००, मनमाडमध्ये चार हजार ४००, उमराणेत चार हजार, सटाणामध्ये चार हजार २५० रुपये असा भाव राहिला. येवल्यात तीन हजार ८५०, तर नांदगावमध्ये तीन हजार ८०० रुपये असा भाव मिळाला. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात नवीन लाल कांद्याच्या भावात चार हजार रुपयांवरून तीन हजार रुपयांच्या आत घसरण झाली होती. सोमवारी मात्र सटाण्यात दोन हजार ९५० रुपये क्विंटल या सरासरी भावाने नवीन कांद्याच्या झालेल्या विक्रीचा अपवाद वगळता इतरत्र भाव तीन हजार रुपयांच्या पुढे पोचले. नवीन लाल कांद्याला क्विटंलला सरासरी लासलगावमध्ये तीन हजार ३००, मुंगसेमध्ये चार हजार १५०, मनमाडमध्ये तीन हजार १००, देवळ्यात साडेतीन हजार, पिंपळगावमध्ये चार हजार १०० रुपये असा भाव निघाला. दिवाळीमध्ये कांद्याचे लिलाव बंद राहतात. वसुबारसेपासून (ता.१२) १७ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लिलाव होणार नाहीत. त्यामुळे येत्या पंधरवड्यात कांद्याचे भाव टिकण्याची आशा आहे. 

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला

कांद्याच्या पक्वतेचा अभाव 
दिल्ली, पंजाबच्या बाजारपेठेत राजस्थानचा कांदा पोचत असताना तो खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचवेळी नवीन लाल कांद्यामध्ये आर्द्रता अधिक असल्याने हा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पोचेपर्यंत खराब होत असल्याची बाब व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आली आहे. कांद्याला चांगला भाव मिळतोय म्हटल्यावर कांद्याच्या पक्वतेला शेतकऱ्यांनी महत्त्व दिले नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पंधरा ते वीस दिवसांनी विक्रीसाठी येऊ शकणारा नवीन लाल कांदा विक्रीसाठी येत असल्याचे व्यापाऱ्यांना आढळून आले आहे. दुसरीकडे मात्र नाशिकचा कांदा देशांतर्गत बाजारपेठेत पोचताना खराब होत नाही. 

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच


मध्य प्रदेशातील कांदा संपत आल्याची माहिती देशांतर्गत बाजारपेठेत पोचली आहे. अशातच, राजस्थान आणि नवीन लाल कांदा बाजारपेठेपर्यंत पोचण्यात टिकण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शिवाय दिवाळीच्या सुटीनिमित्त लिलाव थांबणार आहेत. दिवाळीनंतर किमान आठवडाभर कामगार मिळणार नाही. ही सर्व परिस्थिती पाहता, आगामी पंधरा दिवसांत उन्हाळ कांद्याला चांगले भाव मिळतील, अशी स्थिती आहे. - विकास सिंह, कांदा निर्यातदार 

दक्षिणेतील कांद्याचे प्रमाण कमी आहे. त्याचवेळी देशांतर्गत ग्राहकांमधून दिवाळीसाठी कांद्याची मागणी वाढली आहे. दिवाळीत न होणाऱ्या लिलावाच्या अनुषंगाने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याच्यादृष्टीने नाशिकच्या उन्हाळ कांद्याला भाव मिळू लागला आहे. - नितीन जैन, कांदा व्यापारी  
 

loading image