हिरवळीने सजला डुबेरेगड! अकरा दैवतांच्या सामाजिक ऐक्याचे प्रतीक; पर्यटकांना गडाची ओढ

dubere gad 1.jpg
dubere gad 1.jpg

नाशिक / डुबेरे : सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेला डुबेरेगड अकरा दैवत ठिकाणांसह हिरवळीने सजल्याने पर्यटनाला आकर्षित करत आहे. वणीदेवीची प्रतिछाया म्हणून प्रसिद्ध असलेल्या आई सप्तशृंगमातेचे अधिष्ठान असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवरात्र महोत्सव, चैत्र पौर्णिमेला गर्दी असते. 

गावातील व सामाजिक सलोखा एक आदर्शवत
गडाच्या पायथ्याशी नागेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी, तर म्हसोबा, पीर, भगवान दत्त, देवी पाऊलका, खंडेराव महाराज, तुळजामाता अधिष्ठान, नागेश्वर, मारुती मंदिर, मुंजाबाबा, भैरवनाथ महाराज, गणपती, दहानाथ मंदिरासह रानमेवा, रानभाज्या औषधी वनस्पतींनी परिपूर्ण असलेल्या गडावर आदिवासी, ठाकर, रामोशी बांधव औषधी वनस्पती शोधासाठी भटकंती करताना पाहावयास मिळतात. कोळूची भाजी, फांदीची भाजी, चाई या भाज्या, तर रानसूठ, बडद्याचा कंद, पिठोळी यांसारख्या औषधी वनस्पती गडाची महती वाढवतात. गडावर असलेल्या दर्ग्यावर हिंदू-मुस्लिम सामाजिक सलोखा पाहावयास मिळतो. हिंदू-मुस्लिम दोन्ही समाजातील लोक या ठिकाणी एकत्र येऊन दर्ग्यावर चादर चढवतात. यातून गावातील व सामाजिक सलोखा एक आदर्शवत ठरतो. 

ध्येयासाठी कसरत करून देशसेवेसाठी भरती
हिरवळीने नटलेल्या वडगाव दडी, सोनार दडी, डुबेरे आडसूळ गडावरील पाण्याचे दोन कुंड, तळे संपूर्ण परिसराला श्रावण मासात पर्यटकांच्या मनात ओढ निर्माण केल्याने पावले आपोआप या गडाकडे वळतात. सिन्नर, ठाणगाव, डुबेरे, सोनारी, जयप्रकाशनगर, पाटोळे, मनेगाव, वडगाव, सोनांबे, कोनांबे परिसरातील लोक या ठिकाणी येऊन निसर्गाचा आस्वाद घेतात. सैनिक, पोलिस भरती करणाऱ्या तरुणांची पहाटे गडावर शारीरिक परिश्रमाची तयारी सुरू असल्याने प्रसन्न करणाऱ्या वातावरणात त्यांचाही उत्साह, जोश, देशभक्तीचा जज्बा पहायला मिळतो. डुबेरेसह परिसरातील तरुण याच गड परिसरात आपल्या ध्येयासाठी कसरत करून देशसेवेसाठी भरती झाल्याने परिसरात गडाचं नाव पुढे आले आहे. वणी येथे कडा तुटलेल्या वेळी डुबेरे गडावर वास्तव्य करण्यासाठी सप्तशृंगीमाता आल्याची आख्यायिका सांगितली जाते. महेंद्रगिरी महाराज, भाऊसाहेब ढोली, गाव व तालुक्यातील निसर्गप्रेमी या परिसरात निसर्गसृष्टी सुजलाम-सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 
 

गड परिसर निसर्गाने हिरवळीने सजला

गड परिसर निसर्गाने हिरवळीने सजवला आहे. परंतु सौंदर्य आबाधित व वाढविण्यासाठी गडावर मोठ्या प्रमाणात वनीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने व निसर्गप्रेमींनी पुढे यावे. -भाऊसाहेब ढोली, डुबेरेगड पुजारी 

रिपोर्ट - रामदास वारुंगसे

संपादन - ज्योती देवरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com