
नाशिक : महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना जाहीर झाली. यात मोठ्या प्रमाणात प्रभागांची मोडतोड होऊन ठराविक पक्षाला सोईस्कर, असे प्रभाग झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे दिसून आले. नाशिक रोड व सिडको विभागात काही विद्यमान नगरसेवकांना बसलेला झटका वगळता बहुतांश नगरसेवक सुरक्षित झाले आहेत. विद्यमानांच्या या सुरक्षिततेने मात्र इच्छुकांना निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असून, राजकीय पक्षांनी नवीन चेहरे दिले तरच अन्यथा बहुतांश जुनेच चेहरे सभागृहात दिसतील अशी व्यवस्था झाल्याचे दिसून येणार आहे. (New ward structure For Nashik municipal elections)
नाशिक रोडला पांगापांग
मागील पंचवार्षिकमध्ये एकाच पक्षातील एकमेकांविरोधात राहिलेल्या नगरसेवक आता स्वतंत्रपणे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्येकाचे वर्चस्व असलेल्या व मतपेटी भक्कम असलेले भाग वेगळे झाल्याने चौघा नगरसेवकांचे तोंड विरोधी दिशेला जाऊन प्रभाग भक्कम झाले आहे. काही नगरसेवकांची मात्र झोपडपट्टी भाग जोडला गेल्याने अडचण झाली आहे. सिन्नर फाटा व नारायणबापूनगर हे दोन टोकाला असलेले भाग एकाच प्रभागात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवळालीगाव व विहितगाव स्वतंत्र झाल्याने खऱ्या अर्थाने नैसर्गिक न्याय मिळाल्याची भावना आहे.
पंचवटीत फिर मिलेंगे
पंचवटी विभागात विद्यमान नगरसेवक चोहोबाजूने सुरक्षित झाले असून, सोईच्या प्रभागामुळे फिर मिलेंगे अशी स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. चार नगरसेवकांच्या प्रभाग आठमध्ये पक्षिय राजकारणापेक्षा व्यक्तीगत राजकारण महत्त्वाचे ठरणार असल्याचे दिसून येत आहे. आडगाव व म्हसरुळ या दोन महत्त्वाच्या गावांचा एक प्रभाग तयार झाल्याने गावकीच्या राजकारण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.
सातपूरला आजी-माजी सुरक्षित
सातपूर विभाग विद्यमान नगरसेवकांना सर्वाधिक सुरक्षित झाला आहे. वरकरणी विद्यमान नगरसेवक ओरड करत असले तरी प्रत्यक्षात येथेही सोईचे प्रभाग झाल्याने खुशीचे वातावरण आहे. झोपडपट्टी, औद्योगिक वसाहत, कामगारबहुल भाग, हिंदी भाषिक पट्टा, नातेगोते व गावकीचे भाग एकमेकांत न मिसळता स्वतंत्र झाल्याने नव्या इच्छुकांना एन्ट्री अवघड असल्याचे दिसून येत आहे.
सिडकोत सिमारेषांना कात्री
सिडकोत जवळपास सर्वच नगरसेवकांच्या प्रभागामध्ये दहा ते पंधरा टक्के काट-छाट झाली असली तरी शिवसेनेच्या अधिकाधिक नगरसेवकांसाठी सुरक्षित प्रभाग झाले आहेत. सिडकोच्या सीमा रेषेवरील नगरसेवकांना मात्र फटका बसला आहे. एक गाव दोन प्रभागात विभागले गेल्याने भाजप व शिवसेनेच्या नगरसेवकांना दमछाक करावी लागेल. एकंदरीत सिडकोतील प्रभागरचना विद्यमान नगरसेवकांच्या पचनी पडणार असल्याचे दिसून येत आहे.
मध्य विद्यमानांच्या वळचळणीला
जुने नाशिकचा सर्वाधिक भाग असलेल्या मध्य विभाग विद्यमान नगरसेवकांच्या पथ्यावर पडला आहे. त्यामुळे नव्यांना येथे फार संधी मिळेल, अशी स्थिती नाही. यंदाच्या निवडणुकीतही तेच-तेच चेहरे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून, यात एक-दोन बदल वगळता परिस्थिती जैसे-थे राहील. काठे गल्ली व टाकळी रोड परिसरातील नववसाहतींचा समावेश झाला असला तरी त्याचा मतदानावर फारसा परिणाम होणार नाही.
पश्चिमेत हम साथ-साथ है
उच्चभ्रू भाग असलेल्या पश्चिम विभागात मोठ्या प्रमाणात प्रभागांची तोडफोड झाल्याच्या चर्चा होत्या, परंतु त्या सर्व चर्चांना प्रभागरचनेतून पूर्णविराम मिळाला. येथेही विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग सुरक्षित झाले. अनेक नगरसेवकांना पूर्वीचे म्हणजे एकगठ्ठा मतदान असलेले, परंतु २०१७ मध्ये तुटलेले भाग परत मिळाल्याने दुधात साखर मिसळल्याचा भाव उत्पन्न झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.