esakal | पूर्व भागाला वेगळा न्याय, पश्चिम भागावर अन्याय; मालेगावमधील व्यापाऱ्यांत रोष

बोलून बातमी शोधा

Malegaon
पूर्व भागाला वेगळा न्याय, पश्चिम भागावर अन्याय; मालेगावमधील व्यापाऱ्यांत रोष
sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व दुकाने, आस्थापना १ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. रमजान पर्वामुळे पूर्व भागात या आदेशाचे सर्रास उल्लंघन होत आहे. आझादनगर, नयापुरा, हजारखोली, कुसुंबा रोड, इस्लामपुरा, सरदार मार्केट यांसह पूर्व भागातील बहुसंख्य दुकाने सुरू आहेत. याउलट पश्‍चिम भागात दुकाने सुरू केल्यास महापालिका अधिकारी दंडात्मक कारवाई करतात. पोलिसही कारवाईचा इशारा देतात. पूर्व भागाला वेगळा न्याय व पश्‍चिम भागावर अन्याय या प्रकारामुळे पश्‍चिम भागातील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे.

शुक्रवार आठवडेबाजार व जुम्माची सुटी असल्याने पूर्व भागातील सर्व बाजारपेठांमध्ये गर्दी होती. रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरळीत सुरू होते. पोलिस व्हॅन आली की शटर ओढले जात होते. पोलिसांची पाठ फिरताच व्यवसाय सुरू, असे चित्र सर्वत्र होते. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. विशेष म्हणजे बाजारपेठेत आलेल्या ९० टक्के नागरिकांनी मास्क लावलेले नव्हते. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाला होता. यानंतर पश्‍चिम भागातील व्यापारी अधिक संतापले. यातूनच शहर पोलिस ठाण्यातील हद्दीतील सरदार मार्केट सर्रास सुरू व नजीक शंभर मीटरवरील किल्ला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गूळबाजार, भाजीबाजार या व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट व बंद या दोन भिन्न प्रकारांमुळे व्यापारी संतप्त झाले. यातूनच भाजीपाला, फळे, मासळी विक्रेत्यांनी भाजीबाजारात ठिय्या आंदोलन केले. पोलिस व महापालिकेने समान न्यायाने कारवाई करावी; अन्यथा सर्वच व्यापाऱ्यांना काही अवधीसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली. व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात कृषिमंत्री दादा भुसे तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली आहेत. रमजानसारख्या पवित्र सणाच्या काळात पूर्व भागात कोरोना संसर्ग प्रतिबंधक नियमांची व ‘ब्रेक द चेन’ आदेशाची अंमलबजावणी करणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..