esakal | शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं

बोलून बातमी शोधा

Nashik Oxygen Leak Accident
शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये! तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत.

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई

घरच जणू खाण्यास उठले आहे

डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता. २१) ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत भारती निकम (४४) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यामागे तीन मुली आहेत. मोठी मुलगी तेजस्विनी २३ वर्षांची असून, दोन्ही मुली १२ आणि १५ वयोगटातील आहेत. घटना घडली त्या वेळी तेजस्विनी आईसोबत होती. भारती यांची तब्येतीत सुधारणा होत होती. अशातच ही घटना घडली आणि भारती यांची प्राणज्योत मावळली. तेजस्विनीच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळले. वर्षाभरापूर्वीच वडिलांचे निधन झाले. त्या दुःखातून कसेबसे सावरत असतानाच आईच्या मृत्यूने मायेचे छत्रदेखील हरपले. दोन्ही बहिणी लहान आहेत. पालनपोषण आणि स्वतःचे आयुष्य कसे जाणार, याची चिंता आता तिला लागली आहे. आईचे छत्र असल्याने निधान तेजस्विनी पुणे येथील रुग्णालयात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. आईदेखील तिच्यावर कामाचा ताण पडू नये म्हणून छोटेसे दुकान चालवून हातभार लावत. आई असल्याने दोन्ही लहान बहिणीच्या सांभाळाची चिंता नव्हती. आता सर्वच काही पोरके झाले आहे. घरच जणू खाण्यास उठले आहे, असे वाटत आहे. कुणी शत्रूवरदेखील असा प्रसंग येऊ नये, अशी प्रार्थना करते.

हेही वाचा: मान टाकली, ती वर आलीच नाही! बापाने मुलासमोरच सोडला जीव