esakal | मान टाकली, ती वर आलीच नाही! बापाने मुलासमोरच सोडला जीव

बोलून बातमी शोधा

Nashik Oxygen Leak Accident
मान टाकली, ती वर आलीच नाही! बापाने मुलासमोरच सोडला जीव
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नाशिक : डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात बुधवारी (ता.२१) प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात अनेकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. कुणाला यात यश आले, तर कुणाला अपयश. या मृत्यूच्या तांडवात अनेकांनी आपले वडील, पती, पत्नी, आई, भाऊ गमविला. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही ही कुटुंबे अजूनही दु:खाच्या सावटात आहेत, तर कोणी रुग्णालयात दाखल असलेल्यांसाठी अजूनही धावपळ करत आहे. ज्यांनी आपले आप्तेष्ठ गमविले आहे, त्यांच्यामागे आता केवळ त्यांच्या आठवणी उरल्या आहेत

मिनिटांपूर्वी गप्पा मारणारे वडील…

श्रावण पाटील (६७) यांनी बघताबघता मुलगा दिनेशसमोर जीव सोडला. मुलांसह संपूर्ण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. पूर्वीपेक्षा त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती. केवळ ऑक्सिजनचे प्रमाण काहीअंशी खालीवर होत होते. तीन-चार दिवसांत त्यांना बरे वाटेल आणि सुटीदेखील मिळेल, असे डॉक्टरांनी सांगितले होते. अचानक कुणाची नजर लागावी, असा प्रकार घडला. काही मिनिटांपूर्वी गप्पा मारणाऱ्या वडिलांचा मृतदेहच बघावयास मिळाला. वडिलांनी खाली मान टाकली, ती वर आली नाही. त्यांच्या जाण्याने घराचा आधार गेला. त्याचे वय जास्त होते. परंतु तरीदेखील ते कुटुंटूंबास आर्थिक हातभार लावायाचे. त्यांचा हात डोक्यावर असल्याने मोठ्या संकटातूनही बाहेर पडत होतो. आज तोच हात आमच्या डोक्यावरून गेल्याने कधी नाही ते भरून निघणारे दुःख नशिबी आले आहे.

हेही वाचा: असे घडले मृत्यूतांडव! नाशिक ऑक्सिजन गळतीची घटना cctv मध्ये कैद; पाहा VIDEO

महापालिकेच्या एवढ्या मोठ्या रुग्णालयात अशा प्रकारची घडलेली घटना महापालिकेसाठी शरमेची बाब आहे. त्यांचे, तर काही गेले नाही. परंतु आमच्या डोक्यावरील थोरल्याचा हात गेला. कधी नाही ती भरून निघणारी पोकळी तयार झाली. त्याचा आघात कुटुंबावर झाल्याने घरात केवळ शांतता पसरली आहे.

- दिनेश पाटील (मुलगा)

हेही वाचा: क्षणार्धात झालं होत्याचं नव्हतं! मुलाचं शेवटचं तोंडही पाहू शकली नाही आई