esakal | सकारात्मक विचारांनी वाढले मनोबल! एकाच कुटुंबातील 9 जण कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

Patil Family

सकारात्मक विचारांनी वाढले मनोबल! एकाच कुटुंबातील 9 जण कोरोनामुक्त

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : कोरोनाचा संसर्ग झाला की अनेकांना धडकी भरते. शहरातील सोयगाव येथील राजेंद्र पाटील यांच्या कुटुंबातील नऊ सदस्यांनी मात्र कोरोनावर यशस्वीपणे मात केली. सकारात्मक विचार, आधार, जगण्याची उर्मी, डॉक्टरांचे यशस्वी उपचार यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य माधवराव पाटील (७६) यांनी सांगितले. (Nine members of the same family overcome Corona)

नऊ जण एका पाठोपाठ कोरोनाबाधित

कोरोनाबद्दलची भीती काही प्रमाणात दूर होत असल्याने बाधित कुटुंबालाही मदत करण्यासाठी अनेकजण पुढे सरसावतात. त्यातून कुटुंबाला सावरण्यात व सहकार्यास मोठी मदत होते, असे राजेंद्र पाटील यांनी सांगितले. राजेंद्रनेच वडिलांसह कुटुंबातील नऊ सदस्यांची कोरोना संसर्ग काळात सेवा केली. यामुळे कुटुंबीय यातून सावरले. राजेंद्र यांचे वडील माधवराव पाटील (७६), भाऊ नितीन पाटील (५१), भावजयी प्रमिला पाटील (४३), पत्नी रूपाली पाटील, मुलगी निधी पाटील (१३), ध्वनी पाटील (९), बहीण ज्योती सोनवणे (४५), मेहुणे प्रदीप सोनवणे (४६), पुतणी लीना पाटील (१८) असे एकाच कुटुंबात नऊ जण एका पाठोपाठ कोरोनाबाधित झाले. यातील वृद्ध वडील, पत्नी, वहिनी, बहीण, मेहुणे अशा पाच जणांना डॉ. योगेश पाटील यांच्या शिवम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. भाऊ, मुली व पुतणी असे चौघे घरी विलगीकरणात होते. राजेंद्र वगळता सर्वच बाधित झाल्याने व मुलीच घरी असल्याने दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला. राजेंद्र यांनी धैर्याने या सर्वांचा सामना केला. दवाखान्यात नाष्टा व जेवणाचे डब्बे देताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. कसरत करतानाच त्यांनी परिवारातील सर्व सदस्यांना सकारात्मक राहून कोरोनाशी लढण्याचा धीर दिला.

धीराने ह्या संकटाला तोंड द्या

काहीही झाले तरी घाबरायचे नाही असे मानसिक मनोबल डॉ. पाटील यांनी दिले. त्यांचा आत्मविश्‍वास कामी आला. रुग्णांना मानसिक आधार देतानाच आपण सर्वांना बरे करू, तुम्ही धीराने ह्या संकटाला तोंड द्या असे सांगितले. प्रारंभीचे दोन-तीन दिवस गेल्यानंतर राजेंद्र यांचा मित्र परिवार, नातेवाईक, शेजार्यांनी सर्वांच्या जेवणाची समस्या दूर केली. दररोज आप्तेष्ट डबे पोहच करू लागले. या काळातही हा धीर, आधार व सहकार्य मोलाचे ठरले. दीड महिन्यापूर्वी बाधित झालेल्या पुतण्या कुणालने सर्व सदस्यांच्या गोळ्या-औषधांची जबाबदारी घेतली. नियमितपणे गोळ्या औषधे, व सकस आहार करा. निश्चितच पूर्णपणे बरे व्हाल हा धीर दिला. यामुळे सर्वांनी कोरोनावर मात केली. कोरोनाबाधितांनी घाबरून न जाता सकारात्मक मानसिकता ठेऊन विचार केल्यास कोरोनावर आपण निश्‍चित विजय मिळवू अशी भावना या कुटुंबियांनी व्यक्त केली.

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला

सोयगाव येथील पाटील परिवाराचे मनोबल खरोखरच कौतुकास्पद आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी धैर्याने कोरोना संसर्गाचा सामना केला. बाधितांनी या कुटुंबाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून करोनावर मात करावी. सकारात्मक मानसिकता, सकस आहार या काळात महत्त्वाचा आहे.

- जयप्रकाश बच्छाव, नगरसेवक, मालेगाव महानगरपालिका

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

loading image