esakal | नाशिकमध्ये पाणीकपातीचा निर्णय; आठ दिवसांतून एकदा पाणी राहणार बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Water supply in nashik

नाशिकमध्ये अखेर पाणीकपातीचा निर्णय; अपुऱ्या पावसाचा परिणाम

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, मुकणे व दारणा धरण परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने शहराच्या नियमित पाणीपुरवठ्यात आठ दिवसांतून एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय निश्‍चित झाला असून, दर गुरुवारी संपूर्ण दिवस पुरवठा बंद केला जाणार आहे. दरम्यान, पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या गंगापूर धरणात आरक्षित पाण्यापेक्षा अधिक उपसा करण्यास शनिवार (ता.१७)पासून सुरवात झाली. आरक्षणात २७ दशलक्ष घनफूट पाण्याची तूट निर्माण झाली आहे. (nmc decided to cut water supply in Nashik city once in a week)


शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर, दारणा व मुकणे धरणात अपेक्षित पाऊस न झाल्याने पंधरा दिवसांपूर्वी पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, तुरळक पावसाला सुरवात झाल्यानंतर निर्णय मागे घेण्यात आला. प्रशासनाने पाण्याची सद्यःस्थिती लक्षात आणून दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रविवारपर्यंत धरण परिसरात पाऊस न झाल्यास आठ दिवसांतून एकदा संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. शनिवारपर्यंत धरण परिसरात पाऊस न झाल्याने महापौर कुलकर्णी यांनी एक दिवसाची कपात होणार असल्याचे ‘सकाळ’ला सांगितले. त्यासाठी बुधवार निश्‍चित करण्यात आला आहे.

हेही वाचा: 'घाबरु नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे', राज ठाकरेंचं पदाधिकाऱ्यास आश्वासन


दारणेत अळीयुक्त पाणी

शहराच्या बहुतांश भागात गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. २७५ दिवसांसाठी आरक्षित असलेल्या पाण्याचे आरक्षण शनिवारी संपुष्टात आल्याने अतिरिक्त २७ दशलक्ष घनफूट अतिरिक्त पाणी उपसा करण्यात आले. दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण असले तरी अळीयुक्त पाणी येत असल्याने गेल्या वर्षभरापासून चेहेडी पंपिंग येथून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे.


२० दशलक्ष घनफूट पाणी वाचेल

शहरात सध्या ५२० दशलक्ष लिटर पाणीउपसा केले जाते. आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा बंद केल्यास १८ ते २० दशलक्ष लिटर्स पाणी वाचेल, असा अंदाज आहे. जपून पाणी वापरले तरी किमान चार दिवस पाणी पुरेल इतकी बचत होईल, असा अंदाज आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात ३३५ शाळांची उद्यापासून वाजणार घंटा; निर्बंधही कडक


धरण परिसरात अद्यापही पाऊस पडत नसल्याने नाइलाजाने संपूर्ण एक दिवस पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागत आहे. बुधवारी दिवसभर पाणी बंद करण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला असला तरी गटनेत्यांशी चर्चा करून वार ठरवू.
- सतीश कुलकर्णी, महापौर.


शहरासाठी आरक्षित पाणी (दशलक्ष घनफुटात)
धरण आरक्षित पाणी पाणीवापर शिल्लक साठा

गंगापूर ३८०० ३८२७.४३ -२७.४३
दारणा ४०० १६.७१ ३८३.२९
मुकणे १३०० १२०५.७६ ९४.२४
एकूण ५५०० ५०४९ ४५०.१०

(nmc decided to cut water supply in Nashik city once in a week)

loading image