NMC Tax Recovery : थकबाकीदारांच्या घरासमोर पुन्हा ढोलचा दणदणाट! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhol bajao campaign

NMC Tax Recovery : थकबाकीदारांच्या घरासमोर पुन्हा ढोलचा दणदणाट!

नाशिक : मालमत्ता कराची थकबाकी वसूल करण्यासाठी ऐन दिवाळीत विविध कर विभागाने सुरू केलेली ‘ढोल बजाओ मोहीम’ आता पुन्हा सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत अपेक्षित वसुली करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (NMC Tax Recovery dhol bajao campaign in front of houses of tax arrears nashik news)

जीएसटीनंतर महापालिकेला मालमत्ता करातून अधिक उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनामुळे दोन वर्षांपासून मालमत्ता कर थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. थकबाकी वसूल करण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आगाऊ घरपट्टी करणाऱ्यांना विशेष सवलत दिली जाते. या कालावधीत मालमत्ता धारकांनी योजनेचा लाभ घेतला.

त्यानंतर थकबाकीदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या. या कालावधीतदेखील थकबाकीदारांनी नोटिसांना समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे महापालिकेने थकबाकीदार मालमत्ता धारकांच्या घरासमोर ढोल वाजवण्याचा निर्णय घेतला. दिवाळीच्या कालावधीमध्ये पंधरा दिवस ढोल बजाओ मोहीम राबविण्यात आली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या माध्यमातून सहा कोटी रुपये महसूल प्राप्त झाले, परंतु राजकीय दबाव वाढल्याने मोहीम स्थगित करण्यात आली. मात्र, आता विकासकामांसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी थकबाकीदारांवर पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रथम ढोल वाजवून थकीत कर अदा करण्याचे आवाहन केले जाणार आहे.

त्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांची जप्त केली जाणार आहे. जप्तीनंतर २१ दिवसांच्या आत थकबाकी आता करण्याची मुदत व त्यानंतर मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.