Nashik News : लग्नसराईने घेतला 45 दिवसांचा ‘ब्रेक’; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 marriage

Nashik News : लग्नसराईने घेतला 45 दिवसांचा ‘ब्रेक’; लाखो रुपयांची उलाढाल ठप्प!

येसगाव (जि. नाशिक) : गेल्या पाच महिन्यांपासून धूम असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच पंचांगानुसार ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत गुरू लोप असल्याने तब्बल दीड महिन्याचा म्हणजे ४५ दिवसांचा ब्रेक लागला आहे. (no marriage date available for 45 days from 19 march nashik news)

यंदाही लग्नसराईला तुळशी विवाहापासून ५ नोव्हेंबर २२ नंतर सुरवात झाली. परंतु विवाह मुहूर्त चार दिवशी होते. उर्वरित शुक्र अस्तात नऊ मुहूर्त होते. डिसेंबर २२ या महिन्यात आठ विवाह मुहूर्त होते. जानेवारी २३ मध्ये चार, फेब्रुवारीमध्ये नऊ व मार्चमध्ये पाच मुहूर्त होते. ५ नोव्हेंबर २२ पासून ते १९ मार्च २३ पर्यंत लग्नाचा बार मोठ्या संख्येने उडविण्यात आले.

विवाह मुहूर्त कमी असल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागात घटिक व गोरज मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर लग्नाची धामधूम दिसून आली. मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा असल्यामुळे लग्नसमारंभांची संख्या प्रमाणातच होती. एप्रिल महिन्यात गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत. मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होण्याची चिन्ह दिसत आहेत.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

नोकरवर्ग, तसेच शेतकरीवर्गात मे महिन्याला जास्त पसंती दिली जाते. शाळा, महाविद्यालयांना या महिन्यात सुटी असते. तसेच ग्रामीण भागात शेतकरी शेतीकामाकडे वळत असल्यामुळे जूनमध्ये कुटुंबातल्या विवाह करणाऱ्या मुला-मुलींच्या विवाहाच्या तारखा शक्यतो धरत नाहीत. तसेच पावसाळाही सुरू होतो.

विड्याच्या पानापासून ते सोन्याच्या आभूषणांपर्यंत विवाहकार्यात लागणाऱ्या वस्तूंमुळे एक ते दीड महिन्याच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल थांबण्याची शक्यता आहे. गुरू लोप असला तरी एप्रिल महिन्यात काही पंचांगानुसार १५, २३, २४, २९, ३० या दिवशी विवाह मुहूर्त दिलेले असले तरी या काळात विवाह होण्याची शक्यता कमीच असते, असे काही पुरोहितांचे म्हणणे आहे. सोयीनुसार विवाह तारखा धरल्या जातात.

टॅग्स :Nashikmarriagewedding