भात खरेदीला मुहूर्त सापडेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rice

घोटी : भात खरेदीला मुहूर्त सापडेना!

घोटी : अवकाळी पावसाने इगतपुरी तालुक्यात भाताचे (धान) मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यातून वाचत शेतकऱ्यांची धान कापणीची लगबग सुरू असताना दुसरीकडे मात्र आदिवासी विकास विभागाने अजूनही धान खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. तसेच अनुदानही घोषित केलेले नाही, त्यामुळे शेतकरी सैरभैर झाला आहे. याबाबत लोकप्रतिनिधीही गप्प असल्याने त्यांच्या संतापात भरच पडली आहे.

पावसामुळे झालेल्या नुकसानीतून वाचलेला भात विकून दोन पैसे हाती येतील ही शेतकऱ्यांची आशा प्रशासनाच्या कासवगतीमुळे धुळीस मिळतात की काय अशी स्थिती झाली आहे. गेल्यावर्षी आदिवासी विकास विभागाने विक्रमी धान खरेदी केली. त्यासाठी आधीच नियोजन केले होते, मात्र यंदा अजूनही तशा हालचाली नाहीत. धान खरेदीचा शुभारंभ कधी होणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. वर्षभर राखून ठेवलेले धान व आत्ताचे धान कशाच्या भरवशावर विकायचे हा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या आदिवासी भागात केवळ वीस टक्के धान कापणी शिल्लक राहिली आहे. जवळपास सर्वच भागात धान कापणी शेवटच्या टप्प्यात आली आहे.

हेही वाचा: नागपूर : प्रशिक्षणार्थी परिचारिकांना मिळतात फक्त १२ रुपये

शेतकऱ्यांना न्याय देणारे आणि शेतकरी नेते म्हणून मिरवणारे सध्या कुठे गायब झाले आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केवळ भंपक घोषणाबाजी करणाऱ्यांनी या प्रश्नी आवाज उठविण्याची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हंगाम संपत येऊनही धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच आहेत.

नेतृत्व राहिले की नाही ?

इगतपुरी तालुक्यात नेतृत्वाची आबाळ झाली की काय? बेरोजगार युवक, शेतकरी कष्टकरी, मजूर यांच्यासाठी ज्या तालुक्यातील दमदार (स्व.) नेत्यांनी धरणे आंदोलन करीत तत्कालिन सरकारला जेलभरो आंदोलनाने घाम फोडला होता. आज मात्र ती परिस्थिती दिसून येत नाही. केवळ आपापल्या गटावर लक्ष केंद्रीत करून निवेदने देत शेतकऱ्यांची दिशाभूल करणे सुरू असल्याची टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

loading image
go to top