Nashik : घनकचरा विभागाकडून नगररचना विभागाला नोटीस | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik nmc

Nashik : घनकचरा विभागाकडून नगररचना विभागाला नोटीस

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेमधील एका विभागाने दुसऱ्या विभागाला नोटीस पाठवण्याचा प्रकार यापूर्वी कधी घडला नाही. मात्र महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नगररचना विभागाला चक्क नोटीस पाठवून बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (Notice from Solid Waste Department to Town Planning Department Nashik Latest Marathi News)

गेल्या पंधरा वीस दिवसापासून शहरात कमी अधिक प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे तर पडले आहेत. परंतु, त्या व्यतिरिक्त रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. या चिखलामुळे वाहने घसरून नागरिक जखमी होण्याचे प्रकार होत आहे.

बांधकाम विभागाकडून खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, पावसामुळे मुरूम खड्ड्यात टिकत नाही. तो पाण्यामुळे रस्त्यावर वाहून येतो. त्यामुळे चिकचिक होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने केलेल्या सर्वेक्षणात बांधकाम सुरू असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल असल्याचे दिसून येत आहे.

बांधकाम साहित्याचा मालबा व मुरूम रस्त्यावर येत असल्याने चिखल होऊन परिसरात आरोग्याचे प्रश्‍न निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातील बांधकाम व्यवसायिकांना तातडीने नोटिसा पाठवून कारवाई करावी, अशा सूचना घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिल्या. ज्या भागात बांधकाम चालू आहे.

तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांची आहे. आरोग्य विभागाला कारवाईचे अधिकार नाही, मात्र परवानगी देत असलेल्या नगररचना विभागाला कारवाईचे अधिकार असल्याने त्या विभागाला आपण नोटीस पाठवून कारवाईच्या सूचना दिल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी माहिती दिली.