esakal | पावसासाठी वेधशाळा अन् तज्ज्ञांच्या अंदाजाकडे बळीराजाच्या नजरा; नक्षत्रांचेही अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

farmer waiting for rain

पावसासाठी वेधशाळा, तज्ज्ञांच्या अंदाजाकडे बळीराजाच्या नजरा

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : पावसाने अनपेक्षितपणे दगा दिल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. काहींनी पेरणी केली, तर काहींची बाकी असल्याने दिवसरात्र आकाशाकडे नजरा खिळल्या आहेत. सोबतच वेधशाळा, हवामान खाते आणि विविध हवामानतज्ज्ञांचे अंदाजही शेतकरी रोज पडताळत आहेत. याशिवाय नक्षत्र आणि त्याचे वाहन यावरदेखील पावसाचे गणित जुळत असल्याने पंचांगशास्त्रानुसार नक्षत्रांचे अंदाजदेखील घेतले जात आहेत. (Observations-of-farmers-for-rainfall-and-attention-to-expert-estimates)

आजकालचा पाऊस बेभरवशाचा

आजकाल पाऊस बेभरवशाचा झाला असून, अगदी चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या या पावसाच्या मागेपुढे शेतकरीच नव्हे, तर सर्वच जण घुटमळतात. याचा माग घेताना हवामान खात्याच्या अंदाजाकडे नजरा लागून असतात. आज विज्ञानयुगात पर्जन्य नक्षत्र आणि वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याला तितकेच महत्त्व असून, ग्रामीण भागात हवामान खात्यासह नक्षत्रावरच भरवसा असून, यावरच पावसाचे गणित जुळविले जाते. यंदा हवामान खात्याने सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असे भाकीत केले आहे. मात्र, पहिल्या महिन्यात हे भाकीत खोटे ठरल्याने आता वेगवेगळे हवामानतज्ज्ञ, नक्षत्र व पंचांगशास्त्राचादेखील शेतकरी अभ्यास करून पावसाचा अंदाज घेत आहेत.

शेतकरी पंचांग व त्यातील नक्षत्रावर विश्‍वास ठेवून

प्राचीन काळापासून पावसाचा अंदाज नक्षत्रांनुसार जुळविला जातो. बदलत्या जमान्यात वेधशाळा आधुनिक वैज्ञानिक नियमांवर आधारित पावसाचा अंदाज वर्तवू लागल्या आहेत. पण, नक्षत्रांना हा पर्याय होऊ शकलेला नाही. आजही शेतकरी पंचांग व त्यातील नक्षत्रावर विश्‍वास ठेवून आहेत. ज्योतिषशास्त्र आणि पर्जन्यपूरक आहेत. महाराष्ट्रातील सोलापूरचे विश्‍वसनीय दाते पंचांग, रुईकर पंचांग, पारनेरकर पंचांग, राजंदेकर पंचांग, टिळक पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर अशा सर्वांनीच पर्जन्याचा विचार मांडलेला आहे.

ही आहेत नक्षत्रे...

पंचांगानुसार २७ नक्षत्रे असून, यात पावसाची नऊ नक्षत्रे आहेत. त्यातील मृग हे पहिले नक्षत्र मानले जाते. कृतिका व रोहिणी ही नक्षत्रे पूर्वमोसमी मानली गेली आहेत. विविध रूपात ही नक्षत्रे येतात. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त या नऊ नक्षत्रांना पावसाचे कोंदण लाभले आहे.

हेही वाचा: नाशिककरांचे स्वप्न आजपासून प्रत्यक्षात! शहर बस वाहतूक सेवा सुरू

हेही आहेत अंदाज...

पूर्वीचे लोक अनुभवावर पावसाचा अंदाज लावत होते. आजही या गोष्टी पाळल्या जातात. विशेषतः पाणी गोड न लागणे, आकाशात कावळ्यांच्या अंड्यांसारखे ढग दिसणे, दिशा गायींच्या डोळ्यांसारख्या दिसत असतील, उगवतानाचा सूर्य अत्यंत प्रखर असल्यास, मुंग्या अन्न घेत जोरात जाऊ लागल्या, मासे पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करणे, चिमण्या धुळीत स्नान करताना दिसत असतील, कोकिळ रात्री कूजन करत असेल, मयूर समूह केकारव करत असतील, चंद्राजवळ वलय असल्यास, मांजर नखांनी जमीन उकरते, कुत्रे घरांवर चढून वा उंच ठिकाणी चढून आकाशाकडे पाहत असतील तर २४ तासांच्या आत मोठा पाऊस पडतो, असा अंदाज बांधला जातो.

पावसाबाबत वेधशाळा अन्‌ पंचांगाचे अंदाज आजही जुळतात. ज्योतिष आणि विज्ञान एकमेकांना पूरक आहेत. यामुळे ग्रामीण भागात नक्षत्र व पंचांग विचाराला महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्र जाणून घेतल्यास नक्कीच पर्जन्यविचार अधिक स्पष्टपणे शेतकरी बांधवांना सांगता येईल.-पं. डॉ. प्रसादशास्त्री कुळकर्णी, पंचांग अभ्यासक, येवला

हेही वाचा: कोरोनाचा प्रभाव कमी, मात्र पाय दुखण्याच्या व्याधींमध्ये वाढ

loading image