esakal | धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

बोलून बातमी शोधा

Nashik Oxygen

धक्कादायक प्रकार! एमआयडीसी, अन्न-औषध प्रशासन अधिकाऱ्याकडून ऑक्सिजनची पळवापळवी

sakal_logo
By
प्रमोद दंडगव्हाळ

सिडको (नाशिक) : शहरात ऑक्सिजनअभावी रुग्ण तडफडून मरत असताना दुसरीकडे एमआयडीसी व अन्न-औषध प्रशासनाचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांचे नाव सांगून ऑक्सिजनची पळवापळवी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये सनी इंडस्ट्रिअल म्हणून एक कंपनी कार्यरत आहे. या कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती होत असते. याकरिता सध्या शहरातील खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी व रुग्णाचे नातेवाईक येथे ऑक्सिजन मिळावा म्हणून तासनतास नंबर लावत आहे. परंतु, असे असताना अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी माधुरी पवार या संबंधित कंपनीच्या उत्पादकांवर दबाव टाकून व जिल्हाधिकाऱ्यांचे तोंडी आदेश असल्याचे सांगून मालेगाव, पिंपळगाव आदी ठिकाणी १४० सिलिंडर, तर केवळ मेल टाकून १५० सिलिंडर एमआयडीसीचे अधिकारी नितीन गवळी घेऊन जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

यासंदर्भात श्रीमती पवार यांना दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तसेच, कंपनीचे उत्पादक यांच्या म्हणण्यानुसार कोणत्याही प्रकारचा लेखी आदेश नसतानादेखील श्रीमती पवार या बळजबरीने सिलिंडर घेऊन जात स्पष्ट केले. यामुळे या याठिकाणी आलेल्या खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी व रुग्णांच्या नातेवाइकांना ऑक्सिजन मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

नाशिकचे रुग्णालय व रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. दुसरीकडे अन्न औषध प्रशासनाच्या माधुरी पवार या जिल्हाधिकाऱ्यांचे तोंडी आदेश असल्याचे सांगून १४० सिलिंडर, तर अधिकारी गवळी १५० सिलिंडर पळवून घेऊन गेल्या. हा नाशिककरावर अन्याय होत आहे. याबाबत सखोल चौकशी झाली पाहिजे.

-राकेश दोंदे, नगरसेवक, भाजप

शासनाचे कोणतेही लेखी आदेश न दाखवता अन्न व औषध प्रशासनाच्या प्रमुख माधुरी पवार या १४० ऑक्सिजन सिलिंडर मालेगावला पाहिजे असे सांगून घेऊन गेल्या. तर एमआयडीसीचे अधिकारी नितीन गवळी १५० सिलिंडर घेऊन गेले. त्यामुळे जागेवर ऑक्सिजन घेण्यासाठी आलेल्या रुग्णाच्या नातेवाईक व रुग्णांना काय देणार, असा प्रश्न पडला आहे.

-आर. डी. कोठुळे, उत्पादक, सनी इंडस्ट्रिअल कंपनी.

हेही वाचा: माणुसकी जिवंत आहे! रुग्णांसाठी स्वत:ची कार केली रुग्णवाहिका