Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Commissioner of Police ankush shinde

Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

नाशिक : शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या दहिपूल परिसरात टोळक्याकडून व्यापाऱ्यांमध्ये दहशत माजविण्याच्या पार्श्‍वभूमीवर आपल्या शहराच्या सुरक्षिततेसाठी व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकाने, आस्थापनांबाहेर किमान एक तरी सीसीटीव्ही लावावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे.

त्यासाठी आयुक्तांनी ‘आपल्या शहरासाठी, एक सीसीटीव्ही’ असा अभिनव उपक्रम राबवून त्यात व्यापाऱ्यांनी योगदान द्यावे असेही आवाहन केले आहे. (One CCTV for our city security Appeal of nashik Commissioner of Police to traders Nashik News)

शहरातील गुन्हेगारी घटना, चोऱ्या, रात्री संशयितांकडून होणाऱ्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी महत्त्वाचे ठरत असतात. सीसीटीव्हीमुळे बहुतांशी गुन्ह्यांची उकलच होत असते. त्यामुळे सीसीटीव्ही फक्त आपापल्या दुकानातील वा आस्थापनांतील देखरेखीसाठी जसे महत्त्वाचे असतात.

तसेच, ते दुकानाच्या बाहेर लावलेले असतील तर त्यामुळे गुन्ह्यांच्या दृष्टीने येणाऱ्यांचीही ओळख टिपणे त्यामुळे शक्य होत असते. त्यासाठी व्यापारी पेठा, मोठे संकुल, रस्त्यालगत दुकाने, आस्थापनांनी आपल्या दुकानांच्या वा आस्थापनांच्या बाहेरच्या बाजूनेही सीसीटीव्ही बसविण्याचे आवाहन आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरवासीयांना केले आहे.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

हेही वाचा: Nashik News: हक्क सिद्ध करण्यासाठी वन विभाग अपिलात जाणार का? कारवाईचा चेंडू जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

गेल्या आठवड्यात दहिपूल परिसरात रात्री दोन टोळक्यांमध्ये वर्चस्वाच्या वादातून हाणामारीच्या घटना घडल्या होत्या. या घटनेमध्ये व्यावसायिकांचे व गाड्यांचीही तोडफोड करीत दहशत माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याप्रकरणी स्वतः पोलिसांनी फिर्यादी होत संशयितांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल नोंदविला असून, आत्तापर्यंत १४ जणांना अटकही करण्यात आलेली आहे. पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे व्यापारी पेठेतील भाईगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

या टोळक्यांच्या भितीपोटी व्यापारीही पुढे येण्यास धजावत नसल्याने पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांची धरपकड केली आहे. मात्र, व्यापारी पेठेत मोजक्याच ठिकाणी सीसीटीव्ही असल्याने ते अधिक प्रमाणात असणे आवश्‍यक आहे. त्यामुळे गुन्हेगारीच नव्हे तर शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ते अधिक उपयुक्त ठरू शकेल, असा विश्‍वास आयुक्त शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

"व्यापारी, आस्थापनाधारकांनी आपापल्या दुकानाबाहेर शहराच्या सुरक्षिततेसाठी किमान एक तरी सीसीटीव्ही कॅमेरा लावावा. दुकानाबाहेर वा रस्त्यावर दुर्घटना घडली तर पोलिस सीसीटीव्ही असेल तर त्यातील डाटा कॉपी करून तपास करतील. त्याचा संबंधित व्यापारी वा आस्थापना मालकांना पोलिसांकडून कोणताही त्रास नाही. यामुळे सुरक्षितता लाभेल."

- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त.

हेही वाचा: Nashik Crime News : ओझर खूनप्रकरणी पोलिसांना यश; शोध पथकाला पंधरा हजाराचे बक्षीस