Nashik News : कसमादे भागात ‘कांदा एके कांदा’; 50 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion Cultivation in Shiwar of deola Taluka

Nashik News : कसमादे भागात ‘कांदा एके कांदा’; 50 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज

देवळा (जि. नाशिक) : डाळिंब पिकांवर रोगांच्या आक्रमणामुळे या फळपिकाची झालेली वाताहात, कारखानदारीला लागलेल्या ग्रहणामुळे उसाकडे फिरवलेली पाठ आणि भाजीपाल्याला मिळत असलेले अत्यल्प भाव यामुळे कसमादेतील शेतकऱ्यांनी उस, डाळिंब, भाजीपाला पिकांकडे पाठ फिरवत ‘कांदा एके कांदा’चा कित्ता गिरवणे सुरू केल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड करीत आहे.

यामुळे ‘जिकडे तिकडे कांदेच कांदे’ असे चित्र येथे पहावयास मिळत आहे. कसमादे पट्ट्यातच जवळपास ५०- ६० हजार हेक्टरपेक्षा जास्त कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे. (Onion crop production in Kasmade area Estimated cultivation on 50 thousand hectares area Nashik News)

कसमादेत बहुतांश भागात डाळिंब व उस ही नगदी पिके शेतकरी हमखास घेत असत. परंतु, तेल्या, मर, प्लेग अशा रोगांमुळे डाळिंबाचा गोडवा हरवू लागला आहे. ज्या डाळिंबाच्या जोरावर कितीतरी शेतकऱ्यांनी प्रगती साधली त्यांनीही या रोगांना कंटाळत व वैतागत डाळिंबाच्या बागा काढल्या. त्या तुलनेत डाळिंबाची नवीन लागवड होत नसल्याने डाळिंबाची शेती दिवसेंदिवस कमी होत असल्याचे चित्र आहे. देवळा तालुक्यात २०१४ मध्ये दोन हजार ४३२ हेक्टर क्षेत्र डाळिंब लागवडीखाली होते. ते आता जवळपास ९०० हेक्टरपेक्षा कमी झाले आहे.

डाळिंबासारखीच परिस्थिती उस पिकाची झाली आहे. बंद पडत चाललेले कारखाने, विभाजनामुळे जमिनीचे कमी होत चाललेले क्षेत्र यामुळे उस लागवड फारसे कुणी करताना दिसत नाही. या पिकांऐवजी शेतकरी पुन्हा कांद्याचा जुगार खेळण्यासाठी सरसावत आहे. मध्यंतरी कांदा रोपावरही करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नवीन रोपे टाकावी लागली होती. चांगली रोपे असलेले शेतकरी कांदा लागवडीत व्यस्त आहेत.

कांदा लागवड इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की, मजूर मिळणे दुरापास्त झाले आहे. गेली आठ- दहा दिवस आदिवासी बांधवांचा डोंगऱ्यादेव उत्सव असल्याने मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई भासत होती. आता मजूर उपलब्ध होत असले तरी मक्ता पद्धतीवर भर असल्याने आणि दिवसा वीजपुरवठा नसल्याने सकाळी लवकर तर रात्री उशिरापर्यंत कांदा लागवड केली जात आहे.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: SAKAL Special : गायरानावरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाचे मौन!

उळे (बियाणे) विकणे आहे

उन्हाळ कांदा लागवडीच्या पूर्वार्धात कांदा रोपांची कमतरता भासेल, असे चित्र असताना आता बहुतेक शेतकऱ्यांकडे लागवडीनंतर कांदा रोप उरणार असल्याने ‘उळे विकणे आहे’च्या जाहिराती फोटोसह सोशल मीडियावर झळकत आहेत. दर कमी- जास्त करत जागेवरच व्यवहार होत आहे. तर नातेवाईक मंडळी एकमेकांना मोफत रोप देत असल्याने कांदा लागवडीला आणखी चालना मिळत आहे.

"जमिनीचे विभाजन झाल्याने उसाचे वार्षिक पीक परवडत नाही. शेतकरी उसाचे पीक न घेता कांदा व इतर नगदी पिकांकडे वळला आहे. मात्र, कांद्यालाही यावर्षी अल्प भाव मिळाल्याने शेतकरी कोमात गेला असला तरी नवी आशा व नवी उमेद बाळगत ते जोमात कांदा लागवड करत आहेत. शासनाने कांदा निर्यात वाढवत शेतकऱ्यांना कांद्याचे दोन पैसे मिळतील, यासाठी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे." - कुबेर जाधव, शेती व सहकार अभ्यासक

हेही वाचा: Nashik News : सत्र पूर्ण करण्याची हुकणार Deadline!; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्‍हान