esakal | Onion Export Ban : जिल्ह्यात भडका! केंद्र सरकारने मागविली '६० कोटीं'च्या कांद्याची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

4Onion_101.jpg

मात्र त्याबद्दल रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय झाला नसला, तरी बुधवारी (ता. १६) सकाळी कंटेनर जहाजामध्ये 'लोडिंग'च्या शक्यतेचे संकेत निर्यातदारांना मिळाले. दुसरीकडे निर्यातबंदीमुळे जिल्ह्यात कांद्याचे भाव क्विंटलला ३०० ते ९०० रुपयांनी घसरले. 

Onion Export Ban : जिल्ह्यात भडका! केंद्र सरकारने मागविली '६० कोटीं'च्या कांद्याची माहिती

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : कांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर कांदा आगराच्या जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरल्याने आंदोलनाचा भडका उडाला. कांदा निर्यातबंदी मागे न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याच वेळी निर्यातबंदी होण्याअगोदर सोमवारी (ता. १५) सकाळपासून 'कस्टम'ने बंदरात आणि बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर अडकविलेल्या जवळपास ६० कोटींच्या कांद्याची माहिती केंद्र सरकारने मागविली आहे.

भावात ३०० ते ९०० रुपयांची घसरण 

केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन भाजपच्या दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार आणि धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. सीमेवर आणि बंदरात अडकलेल्या कांद्याची निर्यात व्हावी आणि निर्यातबंदी शेतकऱ्यांप्रमाणेच व्यापारी आणि कांदा व्यापारावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांसाठी घातक ठरेल, असेही श्री. गोयल यांना देण्यात आलेल्या निवेदनात खासदारांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्रातर्फे नाशिकसह मुंबई, तुतीकोरीन, चेन्नईच्या बंदराप्रमाणेच बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर किती कांदा आहे याची माहिती मागविण्यात आल्याचा निरोप मिळताच, निर्यातदारांनी 'कस्टम'च्या कार्यालयात जाऊन माहिती दिली. निर्यातदारांच्या माहितीनुसार मुंबई, चेन्नई, तुतीकोरीनच्या बंदरात आणि बांगलादेश, नेपाळ, भूतानच्या सीमेवर २० हजार टन कांदा अडकून पडला आहे. 

६० कोटींच्या कांद्याची केंद्राने मागविली माहिती

जहाजामध्ये 'लोडिंग' झालेले कंटेनर उतरविण्यात आल्याची माहिती निर्यातदारांना मिळाल्याने त्यांनी नाराजीचा सूर आळवला. कोलंबो, दुबई, अरब राष्ट्रे, सिंगापूरला निर्यातीसाठी जहाजात 'लोडिंग' झालेले २०० कंटेनर उतरविण्यात आल्याची माहिती निर्यातदारांना मिळाली आहे. एवढेच नव्हे, तर बंदर प्रशासन आणि 'कस्टम' या केंद्र सरकारच्या विभागांमध्ये ताळमेळ नसल्याची बाब निर्यातदारांच्या नजरेतून सुटलेली नाही. अशा सगळ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन निर्यातदारांनी निर्यातीसाठी रवाना न झालेल्या कांद्याची मालकी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणी केली आहे. कांदा नाशवंत माल असून, तीन दिवसांमध्ये त्याचे नुकसान सुरू होणार आहे हेही निर्यातदारांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

लिलाव दुपारनंतर सुरू 

कांद्याची निर्यातबंदी होताच, मंगळवारी जिल्ह्यातील बाजारपेठांमधून कांद्याचे भाव क्विंटलला सरासरी ३०० ते ९०० रुपयांनी कोसळले. काही बाजार समित्यांमधील लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले, तसेच व्यापाऱ्यांनी दुपारपर्यंत लिलाव बंद ठेवले होते. त्यामुळे अशा ठिकाणी दुपारनंतर लिलाव सुरू झाले आहेत. बाजारपेठांमधून मंगळवारी क्विंटलला मिळालेला सरासरी भाव रुपयांमध्ये असा (कंसात सोमवारी क्विंटलला मिळालेला सरासरी भाव) ः लासलगाव- एक हजार ९०१ (दोन हजार ८०१), मनमाड- दोन हजार २०० (दोन हजार ८५०), सटाणा- दोन हजार ४७५ (तीन हजार ५०), पिंपळगाव बसवंत- दोन हजार २५० (दोन हजार ५५०), देवळा- दोन हजार ५०० (दोन हजार ८००), नामपूर- दोन हजार ३५० (दोन हजार ७५०). 

सदाभाऊ खोत आज नाशिकमध्ये 

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कांदा निर्यातबंदीप्रश्‍नी थेट केंद्राच्या विरोधात भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र करण्यासाठी ते स्वतः बुधवारी (ता. १६) नाशिकमध्ये येताहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (ता. १७) आंदोलनाची धग वाढविली जाणार आहे. मुळातच, उन्हाळ कांद्याचा पावसामुळे चाळीत झालेल्या नुकसानीचा विचार करता, शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाएवढे पैसे विक्रीतून मिळत असताना केंद्र सरकारच्या पोटात दुखण्याचे कारण काय, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत. 

हेही वाचा > "आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

जिल्हाभरातील आंदोलनाची धग 

० रयत क्रांती संघटनेतर्फे नामपूर, लासलगाव, विंचूरला रास्ता रोको 
० स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात कांद्याची भेट. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन. 
० सटाणा, उमराणे येथे शेतकऱ्यांचे दोन तास रास्ता रोको. 
० थेरगाव येथे शेतकरी संघटनेतर्फे निर्यातबंदीचा निषेध. 
० कळवण येथे शेतकरी संघटना आणि सर्वपक्षीयांतर्फे आंदोलन. 
० निफाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा एल्गार.० चांदवडला दोन तास बंद पाडले लिलाव. 
० देवळ्यात सकाळी लिलाव बंद. दुपारी साडेतीनला सुरू. 
० बोलठाण (ता. नांदगाव) येथे रास्ता रोको. 
० प्रहार संघटनेतर्फे कांदा निर्यातबंदीचा निषेध नोंदवत निर्यातबंदी उठविण्याची मागणी. 

बांगलादेशमध्ये ५० टक्क्यांनी भावाची उसळी
 
बांगलादेशने गेल्या वर्षी निर्यातबंदी करत असताना भारताने त्याबद्दलची माहिती आगाऊ स्वरूपात द्यावी, असे म्हटले होते. यंदा मात्र बांगलादेशला सोडाच पण आपल्या उत्पादक आणि व्यापाऱ्यांना माहिती न देता कांद्याच्या निर्यातबंदीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे बांगलादेशमध्ये कांद्याच्या भावाने ५० टक्क्यांनी उसळी घेतली. बांगलादेशला भारतातून वर्षाला साडेतीन ते चार लाख टनांच्या आसपास कांद्याची निर्यात होते. भारताच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे बांगलादेश सरकारने तुर्कस्तान आणि इतर देशांतून एक लाख टन कांद्याच्या निर्यातीची तयारी सुरू केल्याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत येऊन धडकली आहे.

हेही वाचा > सहनशक्तीचा बांध तुटला! विवाहितेने विहिरीत उडी घेत संपविली जीवनयात्रा; काय घडले?

संपादन - किशोरी वाघ

loading image
go to top