Onion Rate : कांद्याच्या भावात होताय सातत्याने चढउतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

Onion Rate : कांद्याच्या भावात होताय सातत्याने चढउतार

मनमाड : आवक कमी असून देखील कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठेत कांद्याच्या भावात सातत्याने चढउतार सुरू आहे. आज मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवड्यापेक्षा लाल कांदा पाचशे तर उन्हाळी कांदा तीनशे रुपयांनी भाव पडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याची ३५० वाहनाची आवक होती. गेल्या सप्ताहात असलेल्या भावापेक्षा आज कमी झाले. दिवसेंदिवस कांद्याची बाजार समितीत आवक कमी होत चालली असताना भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. साठवण केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता. दोन हजार ते दोन हजार नऊशे रुपयांपर्यंत कांदा विकला गेला. मात्र काही भाव कमी होत गेले आणि त्या प्रमाणात आवकही घटली.

हेही वाचा: शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून घसरण सुरू आहे. साठवून ठेवलेला उन्हाळ कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला. आता हा कांदा संपू लागला आहे. आता नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. या महिनाभरातच कांद्याची घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान कांद्याच्या भावात घसरण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. एकतर हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते. जेव्हा पीक येते तेव्हा भाव नसतो. आता तर माल असूनही त्याला भाव नाही.त्यामुळे जगायचे तरी कसे असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :NashikonionOnion Price