esakal | जिल्ह्यातील २४ धरणांत अवघा ३८ टक्केच पाणीसाठा; एप्रिलमध्ये १६ टक्के घट

बोलून बातमी शोधा

Nashik Dam
जिल्ह्यातील २४ धरणांत अवघा ३८ टक्केच पाणीसाठा; एप्रिलमध्ये १६ टक्के घट
sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : वाढत्या उन्हासोबत पाण्याचा वापर, तसेच बाष्पीभवनही वाढल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. ३१ मार्चला सरासरी ५४ टक्के असलेला साठा १६ एप्रिलला ४४ टक्के झाला. आजमितीस हा पाणीसाठा ३८ टक्क्यांवर खालावला आहे. यामुळे आगामी दोन महिन्यांची चिंता जिल्हावासीयांना लागली असून, पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.

जिल्ह्यात या वर्षी एक हजार १७१ मिलिमीटर (११० टक्के) पाऊस पडला आहे. अर्थात पावसाचे प्रमाण वाढले तरी प्रथमच पावसाच्या माहेरघरी धरण क्षेत्रात मात्र कमी पाऊस, तर दुष्काळी ईशान्य भागात अधिक पाऊस पडल्याने दुष्काळी तालुक्यात सरासरी १५० टक्क्यांवर कृपा केली. मिनी कोकण मानल्या जाणाऱ्या सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी या तालुक्यांत मात्र अवकृपा केली आहे. यंदा पावसाने माहेरघरी पेठ ७९ टक्के, सुरगाणा ७९ टक्के, त्र्यंबकेश्वर ६४ टक्के पाऊस झाला. तालुक्यात सरासरीदेखील गाठलेली नसल्याने जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा या वर्षी मर्यादितच राहिला होता. त्यामुळे या वर्षी लवकरच पाणीसाठा खालावत आहे.

उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची मागणीही वाढली आहे. यामुळे पाण्याच्या उपलब्धतेत वेगाने घसरण होताना दिसते आहे. विशेष म्हणजे मागील २५ दिवसांत १६, तर आठ दिवसांत जिल्ह्यातील धरणातील सरासरी पाणीसाठ्यात सहा टक्के घट झाली आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मार्चअखेर ५४ टक्के पाणीसाठा होता. तोच आता ४७ टक्क्यांवर घटला आहे. ओझर, पिंपळगाव, निफाड परिसरासह येवला शहर व तालुका, मनमाड शहर व मनमाड रेल्वेसाठी पालखेड, करंजवन, वाघाड धरण समूहातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन दिले जाते. मात्र या धरणक्षेत्रात केवळ १८ टक्केच पाणीसाठा असल्याने पुढील पिण्याचे आवर्तन कधी व कसे मिळणार, हा प्रश्न पडला आहे. या धरण समूहातून मागील दोन महिन्यात शेती सिंचनासाठी दोन आवर्तन देण्यात आले आहे. घटलेल्या पाणीसाठ्यामुळे शेती सिंचनाचा तर प्रश्नच उरला नाही. परंतु उपलब्ध पाणी पिण्यासाठी काटकसरीने जुलैत पाऊस पडून धरणात मुबलक पाणीसाठा होईपर्यंत जपण्याची वेळ आली आहे.

अधिक पाऊस पडूनही जिल्ह्याच्या पूर्व भागाला टंचाईची झळ बसू लागल्याने दिवसागणिक टँकरची मागणीही वाढत आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचीही अपेक्षा व्यक्त होत आहे.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

जूनपर्यंत काटकसर

जिल्ह्यात मध्यम १७ व मोठे सात, असे २४ पाणी साठवण प्रकल्प आहेत. यांची एकूण पाणी साठवण क्षमता ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट आहे. मागील वर्षी धरणात २९ हजार ५०८ म्हणजेच ४५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. आजमितीला २५ हजार २२५ दशलक्ष घनफूट (३८ टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगापूर धरण समूहात चार हजार ८६ दशलक्ष घनफूट (४०टक्के), पालखेड धरण समूहात एक हजार ४६४ दशलक्ष घनफूट (१८ टक्के), तर गिरणा खोरे धरण समूहात नऊ हजार ३३८ दशलक्ष घनफूट (४० टक्के) इतकेच पाणी शिल्लक आहे. जूनपर्यंत हे पाणी पुरवावे लागणार असल्याने प्रशासनाला नियोजनाची, तर नागरिकांना पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

प्रमुख धरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफुटमध्ये)

धरण पाणीसाठा टक्केवारी

गंगापूर २,६६७ ४७

पालखेड समूह १,४६४ १८

ओझरखेड ६४३ ३०

दारणा ४,०९१ ५७

भावली ६६६ ४६

मुकणे २,९७८ ४१

वालदेवी ८७९ ७८

कडवा ३७५ २२

भोजापूर १२५ ३५

चणकापूर १,००१ ४१

गिरणा ७,४३७ ४०

हरणबारी ६४६ ५५

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त