Nashik News: पूर्व भागातील उघड्या गटारी बनल्या धोकादायक! पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची नागरिकांची मागणी | Open drains in eastern part dangerous in malegaon Citizens demand for repairs before monsoon Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A dangerous open drain in front of the new bus stand at Malegaon

Nashik News: पूर्व भागातील उघड्या गटारी बनल्या धोकादायक! पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची नागरिकांची मागणी

Nashik News : शहरातील पूर्व भागात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर चौकाचौकात उघड्या असलेल्या मोठमोठ्या गटारी धोकादायक ठरत आहेत.

अनेक वेळा वाहने देखील त्यात अडकून पडत आहेत. या गटारांमुळे लहान मुले, रस्त्याने जाणारे वाटसरु देखील गटारीत पडल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत.

त्यामुळे किमान पावसाळ्यापूर्वी तरी मनपा प्रशासनाने चौकाचौकातील अशा प्रकारचे धोकादायक बनलेल्या गटारी दुरुस्ती कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. (Open drains in eastern part dangerous in malegaon Citizens demand for repairs before monsoon Nashik News)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी ३ मे ला शहरातील पूर्व भागात स्वत: मान्सूनपूर्व शहर स्वच्छतेबाबत आढावा घेतला होता. यानंतर तत्काळ मनपा सभागृहात मान्सूनपूर्व नालेसफाई व स्वच्छता, जंतुनाशक फवारणी आदी विषयांवर संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेतली होती.

या बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांकडून मान्सूनपूर्व शहरातील प्रमुख नाल्यांची सफाई, मेन गटार व गटारींची साफसफाई आदींबाबत आढावा घेत संबंधितांना सूचना केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात शहरातील पूर्व भागात या सूचनांची पुरेपूर अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

पूर्व भागात अनेक गटारी अजूनही कचऱ्याने भरलेल्या आहेत. काही ठिकाणी मोठमोठ्या गटारींवर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी तात्पुरते अतिक्रमण केले असून पूर्व भागातील गल्लीबोळात गटारींच्या समस्या असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शहरातील मोठे नाले व गटारींबरोबरच याठिकाणी पसरलेले पाइप, केबल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्यामुळे पाय अडकून पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. पंधरा दिवसांवर पावसाळा येऊन ठेपलेला असताना देखील अजूनही शहरातील सर्वच गटारींची स्वच्छता झालेली नाही.

त्यामुळे पावसाळ्यात या गटारी तुंबून परिसरात दुर्गंधी व घाण पाणी साचण्याची भीती निर्माण झाली आहे.

सांडपाणी नेहमीप्रमाणे पावसाळ्यात रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. दूषित व सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. बसस्थानकापासून ते थेट देवीचा मळा दरेगावपर्यंन्त रस्त्यालगत असलेली गटार अनेक ठिकाणी उघडी झाली असून साचलेल्या कचऱ्यामुळे शहराचे विद्रूपीकरण वाढत आहे.

त्यामुळे संबंधित यंत्रणेनेने किमान पावसाळ्यापूर्वी तरी सर्व गटारींची देखील स्वच्छता करून गटाररुपी असलेले 'मौत का कुऑँ' सुस्थितीत आणावेत अशी मागणी होत आहे.