esakal | सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव भाविकांविनाच; तब्बल २० कोटींचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Chaitrotsav at Saptashranggad

सप्तशृंगगडावरील चैत्रोत्सव भाविकांविनाच; तब्बल २० कोटींचा फटका

sakal_logo
By
दिगंबर पाटेळे

वणी (जि. नाशिक) : हजारो वर्षांची परंपरा असलेला वणी गडावरील सप्तशृंगीमातेचा चैत्रोत्सव कोरोनाच्या संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी भाविकांविनाच झाला. यात्रोत्सव रद्द झाल्याने सुमारे २० कोटींचा फटका यात्रोत्सवावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांना बसला आहे.

रामनवमी (ता. २१)पासून सप्तशृंगगडावर आदिमाया सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास सुरवात झाली होती. मंगळवारी (ता. २७) चैत्र पौर्णिमा, हनुमान जन्मोत्सव होऊन परंपरेनुसार चैत्रोत्सवाची सांगता झाली. सकाळी चैत्र पौर्णिमेनिमित्त आदिमायेच्या अलंकाराची पारंपरिक सवाद्य मिरवणुकीला फाटा देत शारीरिक अंतर राखून आदिमायेचे आभूषणे मंदिरात नेण्यात आली. पंचामृत महापूजेदरम्यान आदिमायेस हिरव्या रंगाचा शालू नेसवून सोन्याचा मुकुट, सोन्याचे मंगळसूत्र, वज्रटिक, मयूरहार, सोन्याचा कमरपट्टा, तोडे, कर्णफुले, नथ, पावले आदी आभूषणे घालून आकर्षक साजशृंगार करण्यात आला. मध्यरात्री दरेगावचे गवळी पाटील यांनी कीर्तिध्वज फडकविल्यानंतर पहाटे चंद्राच्या व उगवत्या सूर्याच्या किरणांच्या प्रकाशात शिखरावर फडकलेल्या कीर्तिध्वजाचे सप्तशृंगगडवासीयांनी दर्शन घेतले.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

यात्रोत्सवात सप्तशृंगगडाच्या मार्गावर असलेली गावे, रस्त्यालगत राहाणारे आदिवासीबांधव व व्यावसायिकांना मोठा आधार यात्रोत्सवातून मिळतो. त्याचबरोबर यात्रोत्सव काळात गडावर खासगी वाहनांना बंदी घातल्याने फक्त राज्य परिवहन महामंडळाच्याच बस भाविकांची वाहतूक करीत आहेत. त्यामुळे महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट भाविकांवर येऊ नये, यासाठी सप्तशृंगीदेवी ट्रस्ट, सप्तशृंगगड व नांदुरी ग्रामपंचायत, पुरोहित संघ, ग्रामस्थ, व्यापारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी संयुक्तिकरीत्या प्रशासनाच्या आदेशाची अंमलबजावणी केली. भाविकांनी घरातच थांबून प्रशासनास सहकार्य केल्याने जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश देशमुख, पोलिस अधीक्षक सचिन पाटील, उपविभागीय अधिकारी, सरंपच रमेश पवार व पदाधिकारी, ग्रामस्थांसह सर्व यंत्रणा व भाविकांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’व्यावसायिकांचे नुकसान

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने आदिमायेचा चैत्र यात्रोत्सव दुसऱ्यांदा रद्द करावा लागला. त्यामुळे गडावर याही वर्षी सुमारे दहा लाख भाविकांना यात्रोत्सवास मुकावे लागले आहे. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यावसायिकांना दुकाने शटडाउन करावी लागल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. व्यावसायिकांसमोर मोठे आर्थिक संकट ओढावले आहे

loading image