esakal | नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

बोलून बातमी शोधा

nashik oxygen
नाशिक ऑक्सिजन गळती : संशय बळावला! ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाची दुर्घटना घडून २४ तासांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतरही ऑक्सिजन टँकच्या देखभाल दुरुस्तीसह ऑक्सिजन भरण्याची जबाबदारी असलेल्या पुण्याच्या टायो निप्पॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अद्याप संपर्कही न केल्याने संशयाचे धुके गडद झाले आहे. विशेष म्हणजे ऑक्सिजन भरतानाच अधिक दाबामुळे ऑक्सिजन गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज काढल्याचे समजते. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज चौकशी समितीला सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: धक्कादायक! सॅनिटायझर पिऊन कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मध्यवर्ती कारागृहातील प्रकार

ऑक्सिजन ठेकेदार कंपनीचा लागेना थांगपत्ता

महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन नाहक २४ जणांचा बळी बुधवारी (ता. २१) गेला. या घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने सात सदस्यांची समिती घोषित केली. घटनेनंतर टायो निप्पॉन कंपनीच्या एकाही अधिकाऱ्यांनी संपर्क केला नाही. महापालिकेने संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कंपनीच्या एकाही अधिकाऱ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, महापालिकेच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहेत. यांत्रिकी विभागाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज असताना पेन ड्राइव्हमध्ये अपलोड करून सोपस्कार पार पाडला. वास्तविक घटनेचे गांभीर्य ओळखून नेमका निष्कर्ष काढण्याची आवश्यकता असताना यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी अतिरिक्त आयुक्तांकडे फुटेज दिल्याची माहिती दिली.

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : उच्चस्तरीय चौकशी समितीत कोण कोण असणार?

कंपनीवरचा संशय गडद

टँकरमध्ये ऑक्सिजन भरताना कंपनीचा तांत्रिक माहिती असलेला अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे. करारात तशा बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. परंतु, ऑक्सिजन भरताना कंपनीचा एकही अधिकारी उपस्थित नसल्याची बाब समोर येत असून, ही बाब तपासण्याची जबाबदारी यांत्रिकी विभागाची आहे. कंपनीचे अधिकारी संपर्कात येत नसल्याने संशय गडद होत आहे.

समितीकडून चौकशीला सुरवात

दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या समितीने पहिल्या दिवशी तांत्रिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली. घटना घडल्यानंतर व पूर्वीच्या परिस्थितीची पाहणी केली. ऑक्सिजन टाकीची स्थिती, यापूर्वी चाचण्या घेण्यात आल्या का, आदींची पाहणी केली, परंतु संबंधित कंपनीचे अधिकारी उपस्थित नव्हते. ऑक्सिजन प्लॅन्ट चालविण्यापूर्वी घेतलेल्या चाचण्यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली.