esakal | आदिवासी भागात ऑक्सिजनचा तुटवडा; तालुक्यातील यंत्रणा मात्र हतबल

बोलून बातमी शोधा

Oxygen Shortage
आदिवासी भागात ऑक्सिजनचा तुटवडा; तालुक्यातील यंत्रणा मात्र हतबल
sakal_logo
By
रविंद्र पगार

कळवण (जि. नाशिक) : कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण वाढू लागल्यानंतर रुग्णांना असलेली ऑक्सिजनची (Oxygen) गरज वाढली आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून कळवणसह आदिवासी तालुक्यात कोविड सेंटर (Covid Center) , रुग्णालय, खासगी कोविड सेंटरला ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचे समोर आले असून, महसूल, आरोग्य यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन विभाग एकमेकांकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करत असल्यामुळे आदिवासी भागातील (tribal areas) रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे, तर तालुक्यातील यंत्रणा हतबल झाली आहे. (Oxygen shortage in tribal areas of Nashik district)

गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांकडून ड्युरा आणि जम्बो सिलिंडर भरून मिळत नसल्याने वाहनांना माघारी फिरावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा यंत्रणेला आदिवासी व ग्रामीण भागात ऑक्सिजन पुरवठा करण्यास अपयश आले असून, जम्बो सिलिंडर उपलब्ध करून दिले तरी भरून दिले जात नाही. त्यामुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेचा रुग्णावर उपचाराऐवजी ऑक्सिजन मिळविण्यासाठी वेळ जात असल्यामुळे ऑक्सिजनच्या नियोजनासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पुढे आली आहे.

हेही वाचा: खडतर प्रवासातून यश! सहाय्यक पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती

कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ या भागात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढू लागले असून, बाधित रुग्ण कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. मात्र, या तालुक्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा कायम आहे. त्याचा दुष्परिणाम रुग्णांना भोगावा लागत असून, उपचारासाठी रुग्ण आणि नातेवाइकांना धावपळ करावी लागत आहे. शिवाय ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने नवीन रुग्णदेखील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेतले जात नाहीत. ऑक्सिजनची गरज न भासणारे रुग्ण दाखल करून घेण्याकडे प्राधान्य दिले जात आहे.

ऑक्सिजनची पातळी कमी असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज असल्यामुळे रोज ऑक्सिजनची मागणी वाढत असल्यामुळे कोविड सेंटर, खासगी कोविड सेंटरमधून जम्बो सिलिंडर भरण्यासाठी वाहने पुरवठादाराच्या प्लांटवर उंबरठे झिजवत आहेत. ड्युरा सिलिंडर, जम्बो सिलिंडर भरून मिळविण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणा जिल्हा महसूल प्रशासन, जिल्हा शल्यचिकित्सक, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्या संपर्कात राहून सिलिंडर भरून देण्याची मागणी नोंदवत आहेत. मात्र, तिन्ही यंत्रणा एकमेकांकडे बोट दाखवत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव समोर येत आहे.

सिलिंडरची पळवापळवी

उत्पादक व पुरवठादारांकडून त्यामुळे मनमानी होत आहे. प्लांटवर ऑक्सिजन सिलिंडरची पळवापळवी होत असल्याने आदिवासी भागात ऑक्सिजन पुरविण्यात जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली असल्यामुळे ‘ऑक्सिजन द्या हो...’ असे म्हणण्याची वेळ आदिवासी रुग्णांवर आली आहे.

हेही वाचा: तरुणाचा हातपाय बांधलेला विहिरीत मृतदेह; संशय बळावला

रुग्णांच्या जिवाशी खेळ...

कळवण या आदिवासी तालुक्यातील अभोणा व मानूर येथे कोविड सेंटर असून, दोन खासगी कोविड सेंटर सुरू आहेत. कळवण तालुक्यात रोज १०० जम्बो सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना केवळ १० ते २० सिलिंडर देऊन बोळवण केली जाते, तर कधी काहीच मिळत नाही. हीच परिस्थिती सुरगाणा, दिंडोरी, पेठ या आदिवासी तालुक्यांत असून, जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा जाणूनबुजून आदिवासी भागातील रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप आदिवासी जनतेने केला आहे.