Latest Marathi News | समांतर बाजारपेठ भोंगळे रस्त्याला आले ओंगळ स्वरूप; पायी चालणे बनले दुरापास्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Damaged  condition of road in city

समांतर बाजारपेठ भोंगळे रस्त्याला आले ओंगळ स्वरूप; पायी चालणे बनले दुरापास्त

नांदगाव (जि. नाशिक) : येथील कमालीचा बकालपणा आलेल्या भोंगळे रस्त्यावर आता मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पादचाऱ्यांना डबक्यातून वाट शोधावी लागत आहे. वाहनधारकांना आपला दैनंदिन बाजारहाट करण्यासाठी कसरत करावी लागते. अगोदरच शहरातील बाजारपेठेत व अरुंद गल्लीबोळातील रस्त्यावर मार्गक्रमण करणे दिव्य बनलेले असताना आता भोंगळे रस्त्याची भर त्यात पडलेली आहे. (parallel market bhongale road bad condition nashik Latest News)

भोंगळे रस्त्यावर दाटीवाटीने रोजचा बाजार भरतो. भाजीपाला व अन्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून साधे पायी चालणेदेखील मुश्किल झाले आहे. कपड्यांवर घाणेरडे पाणी घेत कसरत करत पायी चालणारे बापडे प्रशासनाला दोष देत असल्याचे दृश्य आहे. लेंडी नदीपात्रात तयार करण्यात आलेला हा रस्ता बकालपणाचा कळस झाला आहे.

 रस्त्यावर व लगत भाजीपाला मार्केट आहे. पाण्यात तरंगणारी भाजी बघताना पाण्याचे तळे तयार झाले की, भाजीपाल्याचे मळे झाले, असा प्रश्‍न पडतो. येथे भाजीपाला, मटन, मासे, फळे, बोंबिल विक्रेत्यांनी सर्वच दुकाने एकाच रस्त्यावर मांडली असल्याने भोंगळे रस्ता जणू मल्टीपर्पज बाजार झाला आहे. काही दशके आधी नाल्याचे पात्र असलेली ही जागा भोंगळेनामक मुख्याधिकाऱ्यांनी त्यावर रस्ता बांधून तयार केली.

रहदारी वाढल्याच्या अनुषंगाने व्यवसायाला अजून एक रस्ता मिळाल्याने छोटे विक्रेते, दुकानदार, व्यावसायिक खुश झाले. त्यांनी या रस्त्यावर बस्तान मांडले. त्याला नाव देण्यात आले ‘भोंगळे रस्ता.’ बाजारपेठेला अजून एक समांतर बाजारपेठ तयार झाली. नाल्याच्या प्रवाहाला बांध घालून तयार केलेली बाजारपेठ व रस्ता मात्र नैसर्गिक प्रवाहापुढे टिकला नाही.

पूर आला की नाल्याचे पाणी मानवाने वळवलेल्या मार्गाने न जाता मुळच्या नैसर्गिक उतारावरून घराघरात व दुकानात जाऊन नुकसान होत असल्याचा अनुभव येत आहे. अनेकदा रस्ता दुरुस्त केला गेला. पण, शेकडो वर्षे निसर्गाच्या नियमानुसार तयार झालेला नाला व त्यातून वाहणारे पाणी मात्र आपला मार्ग विसरलेले नाही.

आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर

नदी- नाल्यांना पूर येतो. परंतु, रस्त्याला येणारा पूर हे अघटीत आहे. सवंगतेसाठी एखादी अर्धवट केलेली गोष्ट भविष्यात त्रासदायक ठरते, याचे उदाहरण म्हणजे भोंगळे रस्त्याला येणारा पूर. हे कटू सत्य नागरिक अनुभवत आहेत. रस्त्यावरील खड्डयातील पाणी दुकानातील मालावर उडते.

टायरचे घाण पाणी व त्यावरच पाणी मारून विक्री करणारे दुकानदार हे दृश्य अस्वस्थता वाढवते आहे. दुर्गंधीयुक्त पाणी केवळ भोंगळे रस्त्यावरच नव्हे तर गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी ठिकाणी साचले आहे. डास, मच्छरांमुळे रोगराई पसरत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.