‘MVP’मध्ये 20 वर्षांनंतर ‘परिवर्तन’

MVP Election Result news
MVP Election Result newsesakal

नाशिक : नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेच्‍या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (ता. २९) रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तब्‍बल २० वर्षांनंतर संस्‍थेत ‘परिवर्तन’ घडले असून, ‘परिवर्तन’चे उमेदवार ॲड. नितीन ठाकरे यांनी नीलिमाताई पवार यांचा पराभव करत सरचिटणीसपदी बाजी मारली.

परिवर्तन पॅनलच्‍या सर्व उमेदवारांनी आघाडी घेतलेली असताना, अध्यक्षपदाचे उमेदवार आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांना पराभवाचा धक्‍का बसला. प्रगती पॅनलचे डॉ. सुनील ढिकले मात्र अध्यक्षपदी विजयी झाले. (Parivartan panel elected after 20 years in MVP election Nashik Latest Marathi News)

संस्‍थेच्‍या (कै.) रौंदळ सभागृहात मतमोजणी प्रक्रियेला सकाळी आठपासून सुरवात झाली. प्रारंभी पदनिहाय मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. यानंतर प्रत्‍येक पदनिहाय पदाधिकारी व तालुका संचालकांच्‍या तालुकानिहाय मतपत्रिका पेटीत बंद करण्यात आल्‍या. एकपर्यंत विभागणीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्‍यक्षात दुपारी साडेतीनपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहिली.

प्रत्‍यक्ष मतमोजणीला दुपारी साडेचारच्‍या सुमारास सुरवात झाली. परिवर्तन पॅनलचे प्रमुख ॲड. नितीन ठाकरे मतमोजणीच्‍या ठिकाणी दुपारी दोनपासून दाखल होते. संपूर्ण प्रक्रिया पार पडेपर्यंत ते ठाण मांडून होते. प्रगती पॅनलच्‍या प्रमुख नीलिमाताई पवार यांनी सायंकाळी मतमोजणीच्‍या ठिकाणी भेट देत उमेदवारांशी संवाद साधत परिस्‍थिती जाणून घेतली.

बोरस्‍ते, महाले, भालेराव अन्‌ पिंगळे, आहेरांचा दारुण पराभव

मावळते सभापती माणिकराव बोरस्‍ते यांच्‍यासह संचालक नानासाहेब महाले, उत्तम भालेराव, सचिन पिंगळे, डॉ. जयंत पवार आणि केदा आहेर यांचा दारुण पराभव झाला. जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, विश्‍वास मोरे, डी. बी. मोगल, प्रवीण जाधव, डॉ. सयाजी गायकवाड, कृष्णाजी भगत, विजय पगार, संदीप गुळवे आदींचा विजेत्‍यांमध्ये समावेश आहे.

२००२ ते २०२२ पर्यंत पवारांचे वर्चस्‍व

(स्‍व.) डॉ. वसंतराव पवार यांनी २००२ मध्ये निवडणूक जिंकत मविप्रचे नेतृत्‍व हाती घेतली. त्‍यानंतर २००७ च्‍या निवडणुकीतही त्‍यांनी यश मिळविले. मात्र त्‍यांच्‍या अकाली निधनानंतर श्रीमती पवार यांच्‍याकडे सरचिटणीसपदाची धुरा समाजाने सोपविली होती.

पुढे २०१२ मध्ये त्‍यांनी निवडणूक जिंकत सरचिटणीसपद आपल्‍याकडे कायम राखले. २०१७ च्‍या निवडणुकीतही प्रगती पॅनलने श्रीमती पवार यांच्‍या नेतृत्‍वाखाली एकहाती सत्ता मिळविली होती. संस्‍थेत ॲड. नितीन ठाकरे यांनी सभापती म्‍हणून नेतृत्‍व केले आहे.

मागील निवडणुकीत पराभवाचा धक्‍का बसल्‍यापासून त्‍यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. ॲड. कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, डी. बी. मोगल, डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्‍यासह इतरांची मोट बांधत अखेर ॲड. ठाकरे यांनी संस्‍थेवर विजयी पताका फडकविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्‍या उमेदवारीवर फुली मारूनही परिवर्तनला फारसा फटका बसला नाही.

MVP Election Result news
Sakal Exclusive : NMCच्या जलवाहिनीला समांतर गॅस वाहिनी; MNGLचा धक्कादायक प्रकार

उमेदवारनिहाय मिळालेली मते (कंसात मते)

पद प्रगती पॅनल परिवर्तन पॅनल

अध्यक्ष ः डॉ. सुनील ढिकले (४,९३७) माणिकराव कोकाटे (४,६२८)
सरचिटणीस ः नीलिमाताई पवार (३,४६८) ॲड. नितीन ठाकरे (४,४३५) (आठव्या फेरीअखेर)
उपाध्यक्ष ः दिलीपराव मोरे (४,४९४) विश्‍वास मोरे (४,९६८)
सभापती ः माणिकराव बोरस्‍ते (३,५७८) बाळासाहेब क्षीरसागर (४,३३५) (आठव्या फेरीअखेर)
उपसभापती ः डॉ. विलास बच्‍छाव (४,३७१) डी. बी. मोगल (५,०४२)
चिटणीस ः डॉ. प्रशांत पाटील (४,४११) दिलीप दळवी (५,१४६)

महिला राखीवची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सरला कापडणीस () शोभा बोरस्‍ते ()
सिंधू आढाव () शालन सोनवणे ()

तालुका संचालकपद

इगतपुरी भाऊसाहेब खताळे (४,२६१) संदीप गुळवे (५,२६२)
कळवण धनंजय पवार (४,१२६) रवींद्र देवरे (४,७३९) (नववी फेरी)
नाशिक शहर नाना महाले (४,५३१) लक्ष्मण लांडगे (५,०२३)
बागलाण विशाल सोनवणे (४,५३५) डॉ. प्रसाद सोनवणे (४,९७९)
निफाड दत्ता गडाख (४,२७८) शिवाजी गडाख (५,२५१)
नांदगाव चेतन पाटील (४,५५१) अमित पाटील (५,०१८)
चांदवड उत्तम भालेराव (४,४४१) डॉ. सयाजी गायकवाड (५,१३७)
देवळा केदा आहेर (४,६५२) विजय पगार (४,८८५)
मालेगाव डॉ. जयंत पवार (४,५२८) रमेश बच्‍छाव (५,०६६)
सिन्नर हेमंत वाजे (३,४१४) कृष्णाजी भगत (४,३७६) (आठव्या फेरीअखेर)
येवला माणिकराव शिंदे (४,३३४) नंदकुमार बनकर (५,२६०)
नाशिक ग्रामीण सचिन पिंगळे (४,६०४) रमेश पिंगळे (४,९९५)
दिंडोरी सुरेश कळमकर (४,०७२) प्रवीण जाधव (५,४८५)

"संस्थेच्या सभासदांनी दडपशाही व घराणेशहीविरोधात कौल दिला आहे. गेल्या बारा वर्षांपासून वेठीस धरलेल्या सर्व सेवक व सभासद यांची आज खऱ्या अर्थाने मुक्तता झाली. आम्ही निवडून आलेलो उमेदवार संस्थेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत."
- ॲड. नितीन ठाकरे, प्रमुख, परिवर्तन पॅनल

"सभासद मतदार हा राजा असून, त्यांनी दिलेला कौल मान्य करायला हवा. कार्यकारिणीत काम करताना सभासद, विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्यासाठी कटिबबद्ध आहे."

- डॉ. सुनील ढिकले, अध्यक्षपदाचे विजयी उमेदवार

MVP Election Result news
कळवणच्या लाचखोर सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्यास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com