esakal | कोरोनाची लाट अन्‌ रेल्वे यार्डात अडकली पॅसेंजर! प्रवाशांच्या नशिबी प्रतीक्षाच
sakal

बोलून बातमी शोधा

passenger railway

कोरोनाची लाट अन्‌ रेल्वे यार्डात अडकली पॅसेंजर

sakal_logo
By
संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आदी कारणांमुळे रेल्वेच्या नियमित वेळापत्रकाचा मुहूर्त लागला नसल्याने सामान्यांना रेल्वेच्या प्रवासासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे येणार काळच सांगू शकणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला परवडणारी पॅसेंजर मात्र यार्डातच पडून आहे. तसेच विलगीकरणासाठी देशात अधिग्रहित केलेले चार हजार रेक आजही ‘जैसे थे’ आहेत. (Passenger-railway-stopped-in-railway-yard-in-Corona-wave-jpd93)

देशभरातले चार हजार रेक वापराविना

गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या काळात देशभरातील रेल्वेरुळावरील खडखडाट थांबला व राष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रेल्वेच्या देशभरातील मध्य व पश्चिम विभागासह १६ विभागांत जवळपास पाच हजारांहून अधिक डबे विलगीकरणासाठी ताब्यात घेऊन साठ हजारांहून अधिक बेडची सुविधा त्या-त्या राज्यांत उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने अग्रक्रम दिला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नंदुरबार व पनवेल आदी ठिकाणी त्याची चांगल्या प्रकारे मदत झाली. सध्या कोरोनाची दुसरी लाट पूर्णतः ओसरली नसली तरी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे देशभरात रेल्वेगाड्या धावू लागल्या आहेत. मागणी व आवश्यकतेनुसार रेल्वेमार्गाद्वारे देशात नियमितपणे तीस हजारांहून अधिक विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. त्यातील बहुतांश मार्गावर पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. जोपर्यंत आणि कोरोनाची परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत नवीन वेळापत्रक आणले जाणार नाही.

घोषणांचा पाऊस

रेल्वेने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा देत वेग वाढून वेळ वाचणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पॅसेंजरच्या प्रवाशांना साधारण तिप्पट जादा भाडे मोजावे लागणार, असेही सूचित करण्यात आले होते. लॉकडाउनमुळे रेल्वेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले, असे सांगणाऱ्या रेल्वेने पुढे काहीच केले नाही यासाठी एकूण १६ विभागांतील पाचशे पॅसेंजर गाड्यांची यादीच जाहीर केली. रेल्वेसेवा सुरू होताच त्याची अंमलबजावणी करणार म्हणून सांगण्यात आले होते. त्यासाठी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर केल्यानंतर या गाडीचे थांबे, वेग, वेळ यांचे गणित काय असेल, याची माहिती रेल्वे मंत्रालयाने मागविली होती.

हेही वाचा: चंद्रकांत पाटील यांच्या ‘डीनर डिप्लोमसी’ साठी फिल्डिंग!

पॅसेंजर नसल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान

भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण या ठिकाणी रोज पॅसेंजरने भाजीपाला, फळे व अन्य शेतमालाच्या विक्रीसाठी जाणारे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आदी शेकडो प्रवाशांचा मार्ग बंद झाल्याने बेरोजगारीसह अन्य प्रकारचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय रेल्वेला मिळणारा महसूलही ठप्प झाला आहे.

हेही वाचा: भाजप, शिवसेनेत पक्षांतर्गत पेच; आजी-माजी आमदारांमध्ये टक्कर

loading image