Latest Marathi News | आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!; गॅस पाइपलाइनसाठी 205 km रस्ते खोदकामास परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Pipeline

Nashik News : आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास!; गॅस पाइपलाइनसाठी 205 km रस्ते खोदकामास परवानगी

नाशिक : यंदाच्या पावसाळ्यात गुणवत्ताअभावी रस्त्यांची अक्षरशः वाट लागली असताना आता महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला जवळपास २०५ किलोमीटर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदकामास परवानगी देण्यात आली आहे. रस्त्यांसंदर्भात ‘आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास’, अशी तिखट प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. (Permission to dig 205 km road for gas pipeline in city nashik Latest Marathi News)

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या माध्यमातून घरोघरी स्वयंपाकाचा गॅस पोचविण्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदाई सुरू आहे. वास्तविक नाशिक शहरांमधील रस्त्यांची अवस्था सुस्थितीत होती. शहरातील रस्त्यांचे कौतुक राज्यभर केले जात होते. एमएनजीएल अर्थात महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीने रस्त्यांची खोदाई सुरू केल्यापासून रस्त्यांची वाट लागली आहे. रस्ते खोदताना महापालिकेकडे तोडफोड फी जमा करण्यात आली असली तरी रस्त्यांची मालकी एमएनजीएल कंपनीकडे असल्याप्रमाणे रस्ते खोदून ठेवले आहे.

रस्ते खोदल्यानंतर मातीचा ढिगारा तसाच ठेवणे, केबल तुटल्यानंतर दुरुस्त न करणे, खोदलेल्या भागावरच डांबर ओतून रस्त्याची केल्याचे दाखविणे आदी प्रकारामुळे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पावसाळ्यामुळे रस्त्यांची अवस्था दयनीय झाली. पावसाळा संपल्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्त्यांची डागडुजी सुरू झाली आहे, मात्र एकीकडे डागडुजी होत असताना दुसरीकडे पुन्हा एमएनजीएल कंपनीला रस्ते खोदाई करण्यास परवानगी देण्यात आल्याने आधीच तिखट प्रतिक्रिया उमटत आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: Breaking News : नाशिकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविल्याने तणाव

असे झाले खोदकाम

महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीला ३८ ठिकाणी गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकामाला परवानगी दिली आहे. एकूण २०५ किलोमीटर खोदाईपैकी १६५ किलोमीटर लांबीची खोदाई झाली आहे. सध्या पूर्व विभागात ४६. ९५२ किलोमीटर पैकी ३५. ७ किलोमीटर खोदाई पूर्ण झाली आहे. पश्चिम विभागात ५. ५८ किलोमीटर लांबीची खोदाई करण्यात आली आहे. पंचवटी विभागात ११. ७८२ किलोमीटरची खोदाई करण्यास परवानगी देण्यात आली त्यापैकी ११.३ किलोमीटरची खोदाई झाली आहे.

सातपूर विभागात ४४. ९२४ किलोमीटर पैकी ३६. ९ किलोमीटर लांबीचे खोदकाम पूर्ण झाले आहे. नाशिक रोड विभागात ४८. ७७६ किलोमीटर रस्ते खोदले जाणार आहे. त्यापैकी ३७.९ किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले आहे. सिडको विभागात ४७. ९८१ किलोमीटर पैकी ३८. ४५० किलो मीटर रस्त्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: Nashik News : 'MHADA'तील संशयित उमेदवारांमुळे आरोग्‍यची भरती परीक्षा वादात!