esakal | मुंबई विद्यापीठ ‘बीए’च्या अभ्यासक्रमात ‘दगड आणि माती’
sakal

बोलून बातमी शोधा

Datta patil

मुंबई विद्यापीठ ‘बीए’च्या अभ्यासक्रमात ‘दगड आणि माती’

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : मुंबई विद्यापीठाच्या बी.ए. (मराठी)च्या अभ्यासक्रमासाठी प्रायोगिक रंगभूमीवरचे प्रयोगशील नाटककार दत्ता पाटील लिखित ‘दगड आणि माती’ एकांकिकेची निवड झाली आहे. मराठी नाट्यक्षेत्रातील नाटककार, समीक्षक यांसह दिग्गजांच्या कौतुकाला पात्र ठरलेल्या या एकांकिकेत इतिहास नसलेल्या गावाची अनोखी समकालीन गोष्ट पाटील यांनी मांडली आहे. (play dagad ani mati written by datta patil has been selected for the ba course of mumbai university)


गेल्या दोन दशकांपासून प्रायोगिक रंगभूमीवर वेगळ्या धाटणीचे नाट्यलेखन करून नावलौकिक मिळविलेल्या पाटील यांचे ‘हंडाभर चांदण्या’ नाटक खूप गाजले आहे. महाराष्ट्र फाउंडेशनसह अनेक मानाचे पुरस्कार पटकावलेले हे नाटक यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले आहे.
कणकवली येथून प्रकाशित होणाऱ्या रंगभूमीला वाहिलेल्या ‘रंगवाचा’ नियतकालिकाच्या एकांकिका विशेषांकात ‘दगड आणि माती’ एकांकिका प्रसिद्ध झाली असून, अनेक दिग्गजांनी एकांकिकेचे कौतुक केले. ग्रामीण भागातील तरुण पिढीची विखंडित मानसिकता, वर्तमानविभ्रम, आत्मवंचनेतून वाढत जाणारी शरणागत अवस्था विलक्षण संवादातून, घटनांमधून अधोरेखित करते.


मुंबई विद्यापीठाच्या बीए मराठीच्या द्वि‌तीय वर्षासाठी नाट्यसाहित्य विषयाकरिता नऊ एकांकिका असून, त्यातील आठ गेली चार-पाच दशके मराठी रंगभूमीवर नावाजल्या आहेत. यात आजच्या पिढीचा लेखक दत्ता पाटील यांच्याही नव्या एकांकिकेचा समावेश झाल्याने समांतर रंगभूमीवरील नाट्यकर्मींनी आनंद व्यक्त केला.नाटक लवकरच रंगभूमीवर : शिंदे

‘दगड आणि माती’ हे नाटक रंगभूमीवर लवकरच आणत आहोत. ग्रामीण, आदिवासी भागातील गावातील स्थानिक लोककलावंतांच्या सहभागातून नाटक बसवत आहोत, असे सचिन शिंदे यांनी सांगितले. कोविडची साथ ओसरल्यावर लगेचच नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभर केले जाईल, असेही म्‍हणाले.

सामाजिक उत्तरदायित्व सिद्ध : गायकवाड

‘दगड आणि माती’ नाटकाने पाटील यांच्या लेखनीतील सामाजिक उत्तरदायित्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, अशी प्रतिक्रिया निर्माते, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की हंडाभर चांदण्याने इतिहास घडविला. त्यातून शेकडो गावो टँकरमुक्त करण्याची प्रेरणा मिळाली.

हेही वाचा: यूपीएससी परिक्षार्थीनी नाशिक केंद्र निवडावे : हेमंत गोडसेप्रगल्भ एकांकिका : सतीश आळेकर

एकांकिकेबाबत समाजमाध्यमावर प्रसिद्ध नाटककार, अभ्यासक सतीश आळेकर म्हणाले, की पाटील यांची ‘हंडाभर चांदण्या’ पुण्यात बघितलीय. रंगवाचा या त्रैमासिकाच्या एकांकिका विषेशांकातील 'दगड आणि माती' एकांकिका मस्त जमली आहे. विषय, त्याची मांडणी, संवाद आणि विनोदाची जाण उत्तम आहे.


अस्मितेचा विलक्षण धांडोळा : नाडकर्णी

ग्रामीणतेच्या अस्सलतेसाठी लोकनाट्य व गोंधळ गीताचा वापर केला आहे. लेखन व विषय म्हणून व्यक्तिमत्त्वाचा हा शोध, अस्मितेचा धांडोळा विलक्षण आहे. ही या अंकातली सर्वोत्कृष्ट आशयघन एकांकिका आहे.
-कमलाकर नाडकर्णी, ज्येष्ठ समीक्षक

(play dagad ani mati written by datta patil has been selected for the ba course of mumbai university)

हेही वाचा: पाणी टंचाई नको तर पाउस आणा; पालकमंत्र्यांचा भाजपला सल्ला

loading image