esakal | नामपुरला मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये.

बोलून बातमी शोधा

Nashik police on action mode
नामपुरला मोकाट फिरणाऱ्यांविरोधात पोलिस प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये
sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर, (जि. नाशिक) : शहर व परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरीही संचारबंदी काळात मोकाट विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. यावर उपाय म्हणून पोलीस, ग्रामपंचायत, महसूल प्रशासनाने सोमवारी ( ता. १९ ) संयुक्त मोहीम राबवून मोकाट फिराल, तर कोविड टेस्टला सामोरे जाल आणि कोविड सेंटरला भरती व्हाल, असा संदेश दिला.

कोरोनाचे गांभीर्य नाही

कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असल्याने शासनाने संचारबंदी लागू केली आहे. मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाही कोरोना आजाराला नागरिक गांभीर्याने घेत नसल्यामुळे शहरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती. यावर रामबाण उपाय म्हणून मध्यवर्ती बसस्थानक परिसरात महसूल, आरोग्य, ग्रामपंचायत, पोलीस प्रशासनाने विनाकारण फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद तर दिलाच, त्याबरोबरच त्यांची अँटीजन कोरोना चाचणी देखील केली. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारताच मोकाट फिरणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. नागरिकांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

हेही वाचा: जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने गाठला उच्चांक

पोलिसांना फसवाल, कोरोनाला कसे फसवणार!

बाजारपेठा बंद असतानाही कारण नसताना मोटारसायकलवरून फिरणाऱ्यांची संख्या वाढली होती. दवाखान्यात जायचे आहे, बॅंकेत काम आहे, भाजीपाला खरेदी करायचा आहे, नातेवाईक आजारी आहे अशी वेगवेगळी कारणे देऊन पोलिसांना फसविले जात होते. या मोहिमेत व कोविड तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस मित्र, ग्रामपंचायत कर्मचारी तैनात केले होते. विनाकारण फिरणाऱ्यांची कोविड टेस्ट करण्याचा तत्काळ फंडा अवलंबिला आणि मोकाट फिरणारे सैरभैर पळू लागले. एकूण ३३ जणांची कोविड टेस्ट करण्यात आली. यावेळी जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, नामपूरचे उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस कर्मचारी रविराज बच्छाव, विनोद सावंत, ग्रामसेवक केशवराव इंगळे, आरोग्य कर्मचारी समाधान शेलार आदी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिककरांसाठी धोक्याची घंटा! लिक्विड ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण झाले कमी

मंगळवारपासून ( ता. २० ) पासून अत्यावश्यक साहित्य खरेदीची वेळ शासनाने सकाळी अकरा पर्यंत ठेवली आहे. रस्त्यावर अनावश्यक कारणांनी फिरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच, त्यांची कोरोना चाचणी करून पॉझिटीव्ह आल्यास थेट सरकारी रुग्णालयात भरती केले जाईल .तरी नागरिकांनी घराबाहेर पडून संचार बंदीचे उल्लंघन करू नये आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.
-श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जायखेडा