आदिवासी नृत्यावर पोलिस आयुक्तांनी धरला ‘ठेका’! | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CP Deepak Pandey

आदिवासी नृत्यावर पोलिस आयुक्तांनी धरला ‘ठेका’!

कळवण (जि. नाशिक) : आदिवासींचे ग्रामदैवत असलेल्या डोंगऱ्यादेव उत्सवास मोठ्या उत्साहात सुरवात झाली. मंगळवारी (ता. १४) रात्री नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (CP Deepak Pandey) यांनी काठरे दिगर या गावी डोंगऱ्यादेव उत्सवाला भेट दिली. आदिवासी संस्कृतीबाबत माहिती जाणून घेत सादर केलेल्या नृत्यावर त्यांनी ठेका धरला. या वेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार उपस्थित होत्या. आदिवासी बांधवांनी श्री. पांडे यांना पावरी भेट देत स्वागत केले.

पोलिस आयुक्तांनी जाणून घेतली आदिवासी संस्कृती

भारतीय लोकजीवनात कामना, सिद्धीचे व्रत भरपूर आहेत. परंतु, भारतीय लोकजीवनाचे एक अंग असलेल्या आदिवासी बांधवांमध्ये अशी काही व्रते आहेत की, ती आचरण करण्यास अवघड आहेत. मात्र, तरीसुद्धा पूर्वजांची परंपरा सतत पुढे चालत रहावी, आदिवासी संस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून आजचा सुशिक्षित आदिवासी सुद्धा ही व्रते अगदी काटेकोरपणे तितक्याच श्रद्धेने पाळण्याचा प्रयत्न करीत आहेत. आदिवासींच्या काही व्रतांपैकी एक व्रत म्हणजे ‘डोंगऱ्यादेव’ उत्सव. डोंगऱ्यादेव उत्सव तालुक्यातील कोकणा - कोकणी, भिल्ल, महादेव कोळी हे समाज संपूर्ण गाव एकत्रितरित्या प्रत्येक गावाच्या प्रथेनुसार तीन किंवा पाच वर्षांनी साजरा करतात. हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला सुरु होऊन मार्गशीर्षच्या पौर्णिमेला त्याची सांगता होते. मंगळवारी (ता. १४) रात्री आठला पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी काठरे दिगर गावातील डोंगऱ्यादेव उत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन आदिवासी बांधव निसर्गाप्रती जपत असलेल्या आदिवासी संस्कृतीबाबत माहिती जाणून घेतली. या वेळी आदिवासी बांधवानी पावरी नृत्य करीत उपस्थितांचे मनोरंजन केले.

हेही वाचा: जेव्हा दस्तुरखुद्द राज ठाकरेंकडूनच होते बाळाचे बारसे

आयुक्तांना पावरी वाजवण्याचा मोह

पोलिस आयुक्त दीपक पांडे व आमदार नितीन पवार यांनीही पावरीच्या तालावर माऊली, ग्रामस्थांसोबत ठेका धरला. आयुक्त श्री. पांडे यांचा सत्कार सरपंच विजय गांगुर्डे यांनी पावरी वाद्य देऊन केला. या वेळी श्री. पांडे यांना पावरी वाद्य वाजविण्याचा मोह आवरता आला नाही. श्री. पांडे व आमदार पवार यांनी सर्व ग्रामस्थांसमोर पावरी वाजविण्याचा प्रत्यत्न केला.

या वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, पंचायत समिती सदस्य लालाजी जाधव, रघुनाथ महाजन, पोलिस पाटील राजाराम महाजन, एकनाथ जगताप, डी. एम. गायकवाड, राजू पाटील, अनिल घोडेस्वार, कैलास बहिरम, ग्रामसेवक कपिल बिन्नर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : ट्रॅफिक ‘ट्रायल रन’विरोधात जनआंदोलन