Nashik News: गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसांचाच दबाव! दिंडोरीतील महिला पोलिस अधिकाऱ्यांविरोधात निवेदनाने खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Superintendent of Police Shahaji Umap

Nashik News: गुन्हा मागे घेण्यासाठी पोलिसांचाच दबाव! दिंडोरीतील महिला पोलिस अधिकाऱ्यांविरोधात निवेदनाने खळबळ

लखमापूर (जि. नाशिक) : घडलेला गुन्हा अतिशय गंभीर असून याबाबतची तक्रार मागे घेण्यासाठी मानसिक त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार दिंडोरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस अधिकारीकडून होत असून कुटुंबीयांवर होणारे मानसिक अत्याचार व अन्याय थांबविण्यासाठी दिंडोरीतील हॉटेल व्यावसायिकाने आता जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्याकडे दाद मागितली आहे.

पोलिसच जर असा दबाव आणत असतील तर जनतेने जावे कुठे असा प्रश्‍न उपस्थित करीत या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होत, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (police pressurising people to withdraw crime Sensation after complaint filed against female police officers to SP in Dindori Nashik)

दिंडोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एक गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील संशयित प्रतिष्ठित व प्रशासनाची स्नेहसंबंध असणारा असल्याने खुद्द पोलिसांकडून गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदन दिंडोरीतील हॉटेल व्यावसायिकाने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे, की सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांच्यामार्फत दबावतंत्र वापरण्यात येत आहे. वीस वर्षापासून दिंडोरी शहरात मी हॉटेल व्यवसाय करतो. माझ्यावर कुठलाही गुन्हा दिंडोरी पोलिसात दाखल नाही; परंतु दाखल केलेला गुन्हा मी मागे घ्यावा यासाठी दबाव टाकण्यात येत आहे.

माझा हॉटेल व्यवसायास बदनाम करण्यासाठी उपनिरीक्षक जेजोट दमबाजी करतात. त्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे व मलाही मानसिक त्रास दिला जात आहे. दिंडोरी पोलिस ठाण्यात हॉटेलमध्ये चोरी झाली म्हणून २५ फेब्रुवारी २०२२ व १३ एप्रिल २०२२ ला मी गुन्हा दाखल केला आहे. दोनदा चोरी होऊनही कुठलीही कारवाई झाली नाही.

मी तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून उपनिरीक्षक जेजोट हॉटेलमध्ये येऊन दमबाजी करतात. त्यानंतर रस्त्यात माला तसेच मेहुणा व कुटुंब यांना दमबाजी केली जाते. मला पोलिस ठाण्यात रात्री अकराला बोलविले जाते व रात्री दोनपर्यंत बसून ठेवले जाते.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मला व माझ्या कुटुंबीयांना फक्त त्रास देण्यासाठीच जेजोट पोलिस ठाण्यात बसून ठेवतात. संबंधित जेजोट यांच्याविषयी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्यावर तेथे कुणीही ऐकून घेत नाही.

त्यामुळे मी न्याय कोणाकडे मागायचा? असा प्रश्न पडला आहे. अशा एक ना अनेक अडचणींना मला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे माझी पोलिस उपनिरीक्षक मोनिका जेजोट यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशी मागणी आहे. विशेष पोलिस महानिरीक्षकांनाही हे निवेदन देण्यात आले आहे.

महिला उपनिरीक्षक चर्चेत

एका महिलेच्या संदर्भात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल असतानाही तो गुन्हा मागे घेण्यासाठी एका महिला अधिकाऱ्यांकडूनच दमबाजी होत असल्याच्या प्रकार प्रथमच घडला असून त्या महिला अधिकारी कुणाला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांच्यादृष्टीने गंभीर गुन्हाही काहीच नाही का? मग कायद्याचा उपयोग काय आदी प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केले आहेत,त्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष या घटनेकडे लागले आहे.