Police Recruitment : पोलिस भरतीतील जाचक अटींमुळे अनेकांची संधी हुकणार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police Recruitment

Police Recruitment : पोलिस भरतीतील जाचक अटींमुळे अनेकांची संधी हुकणार!

कोकणगाव (जि. नाशिक) : राज्य सरकारने दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर केलेल्या पोलिस भरतीमुळे अनेक तरुणांना दिलासा मिळाला आहे. या भरतीसाठी तयारी करणाऱ्यांमध्ये एकीकडे आनंद असताना होमगार्डमधूनही पोलिस व्हावेत, या सरकारच्या इच्छेला मात्र भरतीच्या जाचक तरतुदींमुळे होमगार्डच्या तरुणांना मुकावे लागणार आहे.

यासाठी असलेल्या उंचीच्या अटीमध्ये शिथिलता आणल्यास एक-दोन सेंमीने हुकणारी संधी या तरुणांना मिळणार आहे. तरुणांचा हा आक्रोश सरकार ऐकेल आणि त्यात दुरुस्ती करेल, अशी आशा या होमगार्ड तरुणांना लागून राहिली आहे. (Police Recruitment Due to oppressive conditions in police recruitment many will lose their opportunity Nashik News)

शासनाने अठरा हजार पदांसाठी भरतीप्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीत होमगार्डना आरक्षण दिलंय खरे, पण उंचीच्या अटीमुळे हे आरक्षण असूनही काहीही उपयोग नाही, अशी स्थिती होमगार्ड तरुणांची झाली आहे. होमगार्ड, बँडमन, तुरुंगरक्षक, पोलिस पाल्य याबाबत किंचित कमी उंचीच्या मुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यापैकी होमगार्ड हा मोठा घटक आहे. कोरोनाकाळात व सर्व सण-उत्सवांमध्ये पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजवणारे होमगार्ड प्रसंगी जिवाची बाजी लावतो. म्हणून सरकारने पाच टक्के आरक्षणाची तरतूद केली, पण त्याचा फायदा प्रत्येक होमगार्डला होत नाही.

होमगार्ड भरतीचा निकष अगदी पोलिस भरतीप्रमाणे असून, त्यासाठीही शारीरिक व मैदानी परीक्षा देतात. होमगार्ड भरतीत उंचीची पात्रता १६२ सेंमी आहे. मुलींसाठी १५० सेमी आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर ते पोलिस भरतीसाठी आरक्षणाद्वारे पात्र ठरतात. परंतु पोलिस भरतीवेळी उंचीचे पात्रता निकष १६५ सेंमी व मुलींसाठी १५५ सेंमी असल्यामुळे १६२ ते १६५ व मुली १५० ते १५५ दरम्यानच्या होमगार्ड अपात्र ठरतात. उंची कमी असणारे उमेदवार व होमगार्डही बँड्समन या घटकांतून फॉर्म भरतात, जिथे २.५ सेंमी उंचीत सूट दिली जाते. परंतु अठरा हजार पदांमध्ये बॅंड्समन पदांसाठी जागाच नसल्यामुळे दहावी पास व कमी उंचीचे उमेदवार हतबल झाले आहेत.

हेही वाचा: Nashik : आला हिवाळा, जॉगिंगला चला..; पिंपळगावला मैदानावर नागरिकांची गर्दी

"पोलिसांच्या महाभरती प्रकियेत जीआरमध्ये होमगार्ड उंची, बँड्समन जागा व तुरुंगरक्षकांच्या पाल्याच्या आरक्षणामुळे लाखो तरुणांना फटका बसणार असेल तर ही भरती कोणासाठी होतेय? असा प्रश्न अनुत्तरित आहे. सरकार म्हणतंय, की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्यांचे प्रश्न सोडावीत आहे. पण तसं चित्र नाही." - किरण सानप, पोलिस भरती मागदर्शक

"होमगार्ड हा निष्काम सेवा म्हणून पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावतो. सण-उत्सव व आपत्ती असो किंवा कोविडमध्ये कित्येकांनी प्राणाची बाजी लावली. मात्र पाच टक्के आरक्षणाचा फायदा आम्हा १६२ ते १६५ सेंमी उंचीच्या मुलांना न होता ते अपात्र ठरविले जातात. सरकारने यावर योग्य निर्णय घ्यावा."

-योगेश भराडे, होमगार्ड, बँडमन

"मी चार वर्षांपासून होमगार्डची ड्यूटी करतो. एक सेंमी उंची कमी असल्यामुळे आरक्षणाचा फायदा होत नाही. परिणामी मी २.५ सेंमी उंची सूट असणाऱ्या बॅंडमन घटकांचा सराव करत आहे. मात्र यंदाच्या भरतीत आमच्यासाठी एकही जागा नसल्याने काय करावे?"

- ज्ञानेश्वर खाडे, होमगार्ड

"मी होमगार्ड म्हणून पाच वर्षांपासून कार्यरत आहे. उंचीमुळे मला पोलिस होता येत नाही. खेळाडू व बँड्समन उंचीच्या २.५ सेंमीची दिली जाणारी सूट आम्हालाही द्यावी, अशी आमची मागणी आहे. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करावा."

- लता वाघेरे, होमगार्ड

हेही वाचा: Nashik | ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धा : ‘विठ्ठला’ नाटकाने वाजणार तिसरी घंटा

टॅग्स :NashikPolice Recruitment