नाशिक: शहरातील एका पोलिस ठाण्यातील दुय्यम निरीक्षकाकडे दुसऱ्या पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून बदलीसाठी ३५ लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या नाशिक ग्रामीणच्या पोलिस अंमलदारासह शहरातील एका संशयित युवकाविरोधात मुंबई नाका पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील संशयित अंमलदारालाही ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेत बदलीसाठी याच संशयित युवकाने दोन अंमलदारांकडून दोन लाखांना गंडा घातल्याप्रकरणीही गुन्हा दाखल झाला. दरम्यान, खात्यांतर्गत बदलीचा पर्याय असताना गैरमार्गाने बदलीच्या प्रयत्नाची माहिती पोलिस आयुक्तांपर्यंत पोहोचताच त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्याने या प्रकरणाच्या खोलात जात नेमके सत्य बाहेर येणार आहे.