esakal | वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिव्हिरचा मुबलक पुरवठा; गिरीश महाजनांचा राज्य सरकारवर निशाणा

बोलून बातमी शोधा

girish mahajan
वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिव्हिरचा मुबलक पुरवठा; गिरीश महाजनांचा राज्य सरकारवर निशाणा
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये ताळमेळ नसून, कोरोना नियंत्रणात सरकार अपयशी ठरले आहे. वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप राज्याचे माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (ता. २८) येथे केला. महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपला मात्र त्यांनी क्लीन चिट दिली.

हेही वाचा: राज्य सरकारकडून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रावर अन्याय - गिरीश महाजन

माजी मंत्री गिरीश महाजन यांचा राज्य सरकारवर निशाणा

नाशिक दौऱ्यावर आलेले महाजन यांनी महापालिकेच्या रुग्णालयांना भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की लोकसंख्येचा विचार करता कोरोना रुग्णसंख्या वाढीत नाशिक आघाडीवर असणे दुर्दैवी आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन व रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा आहे. या सर्व गोष्टींना तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. आपसात ताळमेळ नसल्याने हे सरकार नियोजनात सपशेल अपयशी ठरले आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजन गरजेनुसार उपलब्ध नाही. खासगी हॉस्पिटलमधील रुग्णांना धावपळ करावी लागते. राज्य सरकारने वास्तविक इंजेक्शन व ऑक्सिजनचे समप्रमाणात वाटप करणे गरजेचे होते; परंतु वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजनसाठी नाशिकमध्ये लोक धावपळ करत आहेत. खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांकडून रिमडेसिव्हिर इंजेक्शन आणून देण्याचे लिहून घेतले जाते, ही धक्कादायक बाब आहे.

राज्य सरकार नाशिकच्या बाबतीत उदासीन

राज्य सरकार नाशिकच्या बाबतीत उदासीन आहे. केंद्र सरकारकडून मदत येते; परंतु राज्य सरकार नियोजन करत नाही. रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करताना पुणे व ठाणे शहराला वेगळा न्याय देत, उत्तर महाराष्ट्राला मात्र या सरकारने वाऱ्यावर सोडले आहे. आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी खंबीर राजकीय नेतृत्वाची गरज आहे. राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी मैदानात असायला हवे. विरोधी पक्षांशी चर्चा करायला पाहिजे. परंतु त्यांच्याकडून असे होत नाही. फक्त बैठका घेत आहेत. विरोधी पक्षाचे नेते राज्यभर फिरून परिस्थिती जाणून घेत आहेत. मात्र त्यांचा सल्ला घेण्याची मुख्यमंत्र्यांना गरज भासत नाही. केंद्राने इंजेक्शन खरेदीचे अधिकार दिले. आता त्याचे नियोजन करण्याऐवजी ग्लोबल टेंडर काढतायत. हे राज्यातील भरकटलेले सरकार असल्याची टीका महाजन यांनी केली.

महापालिकेच्या कामकाजाबाबत समाधान कोरोना नियंत्रणाच्या बाबतीत राज्य सरकारवर अपयशाचे खापर फोडताना भाजपची सत्ता असलेल्या महापालिकेला मात्र त्यांनी क्लीन चिट दिली. नाशिककरांना दिलासा देण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये बिलांच्या अनेक तक्रारी आहेत. असे असले तरी नाशिक महापालिकेने मोठ्या प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून दिले, ही बाब समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या बिटको रुग्णालयात उद्यापासून सीटी स्कॅन यंत्र सुरू होणार असल्याने खासगी ठिकाणी होणारी आर्थिक पिळवणूक थांबणार असल्याचे ते म्हणाले. महापालिकेने वीस हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. यातील सात हजार इंजेक्शन प्राप्त झाली असून, महापालिका रुग्णालयांतील रुग्णांना इंजेक्शन दिल्यानंतर खासगी ठिकाणीदेखील ती वितरित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीसंदर्भात गुरुवारी (ता. २९) भाजपचे शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. गरज पडल्यास राज्यपालांचीदेखील भेट घेऊ. नाशिकची परिस्थिती सुधारण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याची तयारी आहे. -गिरीश महाजन, माजी मंत्री

खडसे-महाजन शाब्दिक वार अद्यापही सुरू

जामनेर (जि. जळगाव) मतदारसंघातील वडगाव बुद्रुक या गावातील एका व्यक्तीने एकनाथ खडसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत गावात पाणी नसल्याची खंत व्यक्त केली. त्यावर उत्तर देताना खडसे यांनी महाजन यांच्या संदर्भात शिवराळ भाषेत विधान केले. त्यात खडसे यांनी महाजन फक्त पोरींचे फोन उचलतो, त्याचबरोबर मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न सोडून महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टीका केली. त्याबाबत विचारले असता महाजन यांनी, खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली. ते म्हणाले, की खडसे यांचा त्यात दोष नाही. त्यांचे वय वाढले आहे. अनेक आजार असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. भाजपमध्ये असताना मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न बघितलेल्या खडसे यांना राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर साधी आमदारकीसुद्धा मिळू शकली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका महाजन यांनी केली.