esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

नाशिक महापालिकेत महाविकास आघाडीची शक्यता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोट निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याने एकत्रित निवडणुका लढविण्याचा सुर आवळण्याची भाषा सुरू झाली आहे. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यासाठी नियोजन सुरू झाले असून, नाशिकमध्ये युतीसाठी आग्रह धरला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्य पातळीवर आघाडी असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र आघाडीचे धोरण निश्‍चित झालेले नाही. पुढील वर्षी राज्यातील नाशिक, मुंबई, पुणेसह अठरा महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांच्या महापालिका निवडणुकीसंदर्भात बैठका झाल्या. शिवसेनेने भगवा फडकविण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेत सत्ता आणताना स्वबळाचा नारा दिला. काँग्रेसनेदेखील स्वबळाचा नारा दिला. त्या दृष्टीने सर्वच पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा: के.व्ही.सुब्रमण्यम मुख्य आर्थिक सल्लागार पदाचा देणार राजीनामा

आता प्रभागरचनेचा कच्चा प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या. त्या पोटनिवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी महाविकास आघाडी म्हणून संख्याबळ अधिक असल्याने महापालिकांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी झाल्यास भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल, असा विश्‍वास निर्माण झाल्याने स्वबळाची भाषा बाजूला पडताना दिसत आहे. नाशिकमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक ज्या जागांवर निवडून आले आहेत. त्या जागा व्यतिरिक्त उर्वरित जागांवर महाविकास आघाडीचे जागा वाटप करून एकत्रित निवडणुका घेण्याची मागणी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांकडे करण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठका घेऊन त्यात एकत्रित प्रस्ताव सादर करण्याची तयारी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...तर निवडणुकीनंतर आघाडी

महाविकास आघाडीचा निर्णय घेताना संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. एकत्रित निवडणूक लढविल्यास सर्वच पक्षांच्या इच्छुकांना न्याय देता येणार नाही. तसे झाल्यास मोठ्या प्रमाणात इच्छुक अन्य पक्षांची म्हणजे भाजप व मनसेची वाट धरतील. त्यामुळे निवडणूक पूर्व महाविकास आघाडीऐवजी निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी आघाडी करावी, असा मतप्रवाहदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

loading image
go to top