esakal | नाशिकमध्ये पाणीकपात अटळ?; पावसाळा लांबल्याने धरणात कमी पाणीसाठा
sakal

बोलून बातमी शोधा

gangapur dam

नाशिक शहरावर पाणीकपातीचे ढग; पावसाळा लांबल्याने पाणीसाठा कमी

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : गंगापूर व मुकणे धरणांमध्ये शिल्लक असेलला अल्प पाणीसाठा व लांबलेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर शहरावर पाणीकपातीचे ढग जमा होत असून, येत्या चार-पाच दिवसांत धरण परिसरात पाऊस न झाल्यास एकवेळ पाणीकपात होण्याची शक्यता तयार झाली आहे. गंगापूर धरण समूहात अवघे २७ टक्के, तर मुकणे धरणात अवघा २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.(Possibility-of-water-shortage-in-Nashik-city-marathi-news)

गंगापूर धरण समूहात २७, तर मुकणे धरणात २४ टक्के पाणीसाठा

नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. पंचवटी, पश्‍चिम, सातपूर, सिडको विभागात गंगापूर, तर सिडको, मध्य नाशिकचा काही भाग इंदिरानगर व पाथर्डी भागात मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणातून मुख्यत्वे नाशिक रोड विभागासाठी पाणी उचलले जाते. १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या २९० दिवसांसाठी साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. यात गंगापूर धरण समूहातून तीन हजार ८००, दारणा धरणातून ४००, तर मुकणे धरणातून एक हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी याप्रमाणे आरक्षण होते.

पाणीकपात अटळ?

गंगापूर धरणातून १ जुलैपर्यंत तीन हजार ६१७, तर मुकणे धरणातून एक हजार १३८ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे. दारणा धरणात आरक्षित असलेल्या एकूण पाण्यापैकी आतापर्यंत अवघे १६.७१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. वालदेवी धरणात सांडपाणी सोडले जात असल्याने चेहेडी पंपिंग येथून पाणी उचलताना अळीयुक्त पाणी येत असल्याने दारणातून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोडसाठी पाणीपुरवठा केला जातो. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात मुकणे व गंगापूर धरणांतून पाणी येते. साधारण १५ जूनच्या आसपास पावसाला सुरवात होते. परंतु यंदा पावसाळा लांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. १० जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास नाशिककरांवर पाणीकपात अटळ राहणार असून, प्रशासनाकडून तशी तयारी सुरू झाली आहे.

हेही वाचा: वय नसले तरी लग्न लावून द्या! अल्पवयीन मुला-मुलीची लगीनघाई

पाण्याचा वापर वाढला

मागील वर्षापासून दोनदा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने या कालावधीमध्ये शहरात पाण्याचा वापर वाढला आहे. सध्या दररोज सरासरी ५२० दशलक्ष लिटर पाणी धरणातून उचलून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणीकपात झाल्यास नागरिकांनादेखील पाणी वापरावर निर्बंध आणावे लागणार आहेत.

‘एफएक्यू’

१. शहराला किती धरणांतून पाणी पुरवठा होतो?

- गंगापूर, मुकणे व दारणा या तीन धरणांतून पाणी पुरवठा होतो.

२. पाण्याचे आरक्षण किती दिवसांसाठी असते?

- पाण्याचे आरक्षण २९० दिवसांसाठी असते.

३. शहरासाठी किती पाणी आरक्षित ठेवले जाते?

- शहरासाठी ५,५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवले जाते.

४. दिवसाला सरासरी किती पाणीपुरवठा केला जातो?

- सरासरी ५२० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो.

हेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात

loading image