Potholes Effects : पाठीच्‍या दुखापतीपासून फ्रॅक्‍चरच्‍या वाढल्‍या तक्रारी | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road potholes

Potholes Effects : पाठीच्‍या दुखापतीपासून फ्रॅक्‍चरच्‍या वाढल्‍या तक्रारी

नाशिक : सततच्‍या पावसामुळे रस्‍त्‍यांची चाळणी झाली असून, खड्डे अपघातांना आमंत्रण ठरत आहेत. सातत्‍याने खड्ड्यांतून वाहन चालविल्‍याने पाठीच्‍या दुखापतीपासून, तर हाडे फ्रॅक्‍चर होण्यापर्यंतच्‍या तक्रारी समोर येत आहेत.

सामान्‍य परिस्थितीच्या तुलनेत तपासणीसाठी रुग्‍णांचे प्रमाणे २५ टक्क्यांपर्यंत वाढलेले आहे. या दुखण्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते. त्यामुळे योग्‍य वेळी डॉक्‍टरांचा सल्‍ला घेण्याचे आवाहन केले जाते आहे. (Potholes Effects Increased complaints of fracture from back injuries nashik Latest Marathi News)

हेही वाचा: ITच्या धाडी जालन्यात, धडकी मात्र नाशिकमध्ये

खड्ड्यांमुळे विशेषतः दुचाकीस्‍वारांना अधिक धोका बघायला मिळतो आहे. रस्‍त्‍यावरील खड्ड्यात जोरात गाडी आदळल्‍याने किंवा, चिखलामुळे गाडी घसरल्‍याने स्‍नायूंना दुखापत होण्याची शक्‍यता निर्माण होते.

अशा परिस्थितीत हाडे फ्रॅक्‍चर होण्याच्‍या प्रकारांमध्ये वाढ झालेली आहे. या खड्ड्यांमुळे दूरगामी व्‍याधी उद्भवू शकतात. यामध्ये प्रामुख्याने मणकयांची गादी सरकणे, गादीची झिज होणे, सांद्यांची झिज होणे, आदीचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत वाढत्‍या वयात हे आजार उद्भवाचे. परंतु आता तरुण वर्गामध्येही मणक्याची निगडित आजार आढळून येत असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे.

वाहनांची देखभाल महत्त्वाची

वाहन चालविताना खड्डे टाळणे आवश्‍यक आहे. याशिवाय वाहनांची वेळोवेळी देखभाल दुरुस्‍ती करायला हवी. वाहनाचे शॉकअप्‍स सुरळीत असावेत, यादेखील महत्त्वाच्या बाबी आहेत.

"सध्या युवा वर्गामध्येदेखील मणक्‍याशी निगडित तक्रारी वाढल्या आहेत. रस्‍त्‍यातील खड्ड्यांमुळे मणकेविषयक, दुखापतीच्‍या रुग्‍ण संख्येतही वाढ झालेली आहे. प्रत्‍येकाने सावधगिरीने वाहन चालवावे. तसेच दुखण्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्‍य उपचार घेणे आवश्‍यक आहे."

-डॉ. विशाल गुंजाळ, स्‍पाईन स्‍पेशालिस्‍ट.

हेही वाचा: पौरोहित्‍यातही महिलाराज : मंत्रोच्चारामुळे सत्तरीतही त्यांचा उत्‍साह कायम

टॅग्स :Nashikpotholesback pain