esakal | गुणकारी शेवग्याला राज्यात पसंती! भाव तेजीत राहण्याची शक्यता 
sakal

बोलून बातमी शोधा

shevga.jpg

शेवगा हे कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक आहे. त्याची छाटणी पावसाळ्यापूर्वी केली जाते. या भागात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेवगा बाजारात मिळतो. यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर नवीन शेवगा बाजारात येण्यास नवीन वर्ष उजाडेल.

गुणकारी शेवग्याला राज्यात पसंती! भाव तेजीत राहण्याची शक्यता 

sakal_logo
By
गोकुळ खैरनार

नाशिक / मालेगाव : गुणकारी शेवगा राज्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरू लागला आहे. डाळिंब व इतर फळ पिकांपेक्षा अधिक पैसे मिळत असल्याने शेवग्याचे क्षेत्र हळूहळू वाढले. गेल्या वर्षी साडेचार हजार हेक्टरवर लागवड असलेले क्षेत्र या वर्षी सात हजार हेक्टरवर पोचले आहे. यात कसमादेसह नाशिक जिल्ह्याचा हिस्सा एक हजार हेक्टरचा आहे. डिसेंबर ते जुलै असे आठमाही पीक असलेला शेवगा राज्यासह तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक या दक्षिणेकडील राज्यांतही मोठ्या प्रमाणावर आहे. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच हजार हेक्टर क्षेत्राची वाढ 
शेवगा हे कमी पाण्यात येणारे शाश्‍वत पीक आहे. त्याची छाटणी पावसाळ्यापूर्वी केली जाते. या भागात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत शेवगा बाजारात मिळतो. यंदा ऑक्टोबरमध्ये पाऊस झाला तर नवीन शेवगा बाजारात येण्यास नवीन वर्ष उजाडेल. लागवडीनंतर पाच ते सहा महिन्यांत शेंगा तोडणीला येतात. तीन ते चार महिने तोडणी सुरू राहते. प्रतिझाड दहा ते तीस किलोंपर्यंत उत्पन्न मिळते. सम व दमट हवामानात शेवग्याची वाढ चांगली होते. उत्तर महाराष्ट्रात उन्हाळ्यात पडणाऱ्या कडक उन्हामुळे या भागात फुलगळतीचे प्रमाण अधिक आहे. तशी शेवग्याची लागवड तिन्ही हंगामांत केली जाते. खरीप व रब्बीसह काही शेतकरी जानेवारी, फेब्रुवारीत लागवड करतात. अनेक जण दुबार व तिबार पीक घेतात. कसमादेतील दुष्काळी पट्ट्यात या पिकाला पसंती मिळाली. जिल्ह्यात मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा व नाशिक या तालुक्यांमध्ये शेवग्याचे पीक घेतले जाते. पीकेएम, कोकण रुचिरा, ओडीसी आदी जातींची लागवड होते. 

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

भाव तेजीत राहण्याची शक्यता 
शेवग्याचे भाव नेहमीच तेजीत राहिले आहेत. इतर पिकांच्या तुलनेने दोन वर्षांपासून शेवगा शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावतो. डिसेंबर २०१९ मध्ये भाव दोनशे रुपये किलोपर्यंत, जानेवारीत शंभर, तर फेब्रुवारीत ४० रुपयांवर आला. कोरोना लॉकडाउनमुळे शेवग्याला अवघा १५ रुपये किलो भाव मिळाला. आगामी तीन महिन्यांत कोरोनाची परिस्थिती निवळली तर नव्या हंगामातील शेवग्याचे भाव तेजीत असतील. 

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 

गुणकारी शेवग्याला राज्यात पसंती 

आम्ही उन्हाळी व पावसाळी असे दोन्ही बहार घेतले. यंदा अतिपावसामुळे फुलगळ होत आहे. ऑक्टोबरमध्ये पाऊस झाल्यास हंगाम महिनाभर पुढे लांबेल. कमी खर्च व कमी पाण्यात येणाऱ्या पिकाकडे तरुण शेतकऱ्यांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहून नियोजन केल्यास शेवगा शेतकऱ्यांना मोठा आधार ठरेल. -ॲड. महेश ऊर्फ मुन्ना पवार, शेवगा उत्पादक, रावळगाव 

शेवग्याच्या शेंगा व पानात जीवनसत्त्वे, तसेच ॲमिनो ॲसिड्‌स, कॅल्शियम, लोह व प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे अलीकडे गुणकारी म्हणून शेवग्याचा वापर वाढला. कोरडवाहू जमिनीतही हे पीक सहज येते. भविष्यात शेवगा लागवडीला मोठा वाव आहे. -गोकुळ अहिरे तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी कार्यालय, मालेगाव  

संपादन - ज्योती देवरे 

loading image