
यंदा चटकदार लोणच्याला महागाईची झळ; गृहिणींची लोणचे तयार करण्यासाठी लगबग
अंबासन (जि.नाशिक) : ग्रामीण भागात लोणचं तयार करण्यासाठी गृहिणींकडून लगबग सुरू झाली असून त्यामुळे घरोघरी चटकदार कैरीच्या लोणच्याचा सुवास दरवळत आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कैरी व त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे भाव वाढल्याने चटकदार लोणच्याला महागाईची झळ बसली आहे.
गावरान कैरीची जागा आता कलमी आंब्याच्या कैरींना
मान्सून पूर्व पावसाच्या वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात कैरी गळून पडली आहे. यामुळे लोणच्याची कैरी दुरापस्त होऊन आवक अजूनही बाजारात मंदावलेली आहे. कधीकाळी मोसम परिसर गावरान आंबा उत्पादनात अग्रेसर होता. या भागात मोठ्मोठ्या आमराईने नटलेले वैभव दिसून येत होते. मात्र कालांतराने डेरेदार आम्रवृक्षांच्या सावटाखाली शेतीपिकांचे उत्पादन कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आंब्याची जुनी झाडावर कुऱ्हाड घातली गेली. परिणामी परिसरात आमराई पडद्याआड झाल्या आणि यामुळे ग्रामीण भागातील घराघरात आंब्याचा घमघमाट दुरावला गेला. आजमितीस बोटावर मोजण्याइतकेच शेतकऱ्यांकडे गावरान आंब्याची झाडे दिसून येत आहेत. वातावरणीय बदल तसेच अवकाळीमुळे बहुतांश आंब्याच्या मोहरांवर परिणाम झाला होता, यामुळे यंदा गावरान आंब्याची गोड चव आबंट होणार असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. गृहिणींकडून लोणचे तयार करण्याची लगबग सुरू झाली असून लोणच्यासाठी लागणारी गावरान कैरीची जागा आता कलमी आंब्याच्या कैरींना दिली आहे. लोणचे तयार करण्यासाठी लागणारा गरम मसालाही तेजीत असल्याने लोणचे तयार करण्यासाठी खिशाला मोठी कात्री लागणार आहे.
हेही वाचा: चक्क डुप्लिकेट चावी लावून चोरट्यांनी पळविली चारचाकी
''ग्रामीण भागात व शेतकरी कुटुबांत आजही लोणच्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घरात पंचपक्वानांचे स्वादिष्ट भोजन असले तरीही लोणच्याशिवाय या सुग्रास भोजनाला स्वाद येत नाही. यामुळे घरोघरी लोणचे घातले जाते.'' - प्रतिभा खैरनार, गृहिणी अंबासन.
''पुर्वी या परिसरात आंब्या झाडांची मोठी आमराई होती. कालांतराने रोगराईने तर बहुतांश आंब्याचे डेरेदार झाडे तोडल्यामुळे गावरान आंबे कमी झाले आणि घराघरातील आंब्याचा घमघमाट दुरापस्त झाला.'' - दोधा सावंत, निवृत शिक्षक अंबासन.
हेही वाचा: लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा सोशल मिडियावर वर्षाव
Web Title: Preparation Of Pickles Starts In Nashik Rural Areas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..