Holi Festival : होळी सणासाठी हारकडे बनविण्यासाठी लगबग! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shaikh family making sugar garlands for Holi festival

Holi Festival : होळी सणासाठी हारकडे बनविण्यासाठी लगबग!

नरकोळ (जि. नाशिक) : कसमादेतील विविध भागांमध्ये होळी सणासाठी लागणाऱ्या साखरेच्या हारकडे बनविण्याची लगबग जोरात सुरु झाली आहे. होळी सणानिमित्त (Festival) असलेले हार कड्याचे महत्त्व आजही टिकून आहे. (process of making sugar garland for Holi festival started in full swing nashik news)

हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी ६ मार्च असल्याने हारकडे बनविण्याचे काम जलदगतीने केले जात आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने या वर्षी हारकडे १० टक्क्यांनी महागले आहे.
होळी ते रंगपंचमी असा हा उत्सव असतो.

६ मार्चला होळी, ७ मार्चला धूलिवंदन तर १२ मार्चला रंगपंचमी आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे सण साध्या पद्धतीने साजरा झाला. यावर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल झाल्याने सर्व सण उत्साहात व आनंदाने साजरे होत आहे.

आदिवासी भागात सर्वांत मोठा ओळखल्या जाणाऱ्या होळी सणाचे महत्त्व आजही टिकून आहे. महाशिवरात्रीनंतर हारकडे बनविण्यासाठी सुरवात होते. मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील अनेक कुटुंबीय वर्षानुवर्षे हारकडे बनवितात. लाकूड, दूध पावडर, लिंबू रसाचा वापर केला जातो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

हारकडे पांढरे शुभ्र होण्यासाठी कलर मसाला, लाकडी संच, दोरा आदि वस्तू यासाठी लागतात. गुढीपाडवा सणाला गुढीला साखरेचा हार घातला जातो. पांढऱ्या शुभ्र आणि तितक्याच चविष्ट गाठी तयार करण्यासाठी कसमादेतील अनेक कुटुंब हा व्यवसाय करीत आहेत.

साखरगाठीची पाककृती साधारण वाटत असली तरी यामागे मोठे कष्ट आहेत. कुटुंबांना वर्षातून एका महिन्याचा रोजगार मिळतो. किरकोळ विक्री करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांना देखील चांगले पैसे मिळतात. एक क्विंटल साखरेत ९० किलो हारकडे तयार होतात.

यासाठी लाकुड , मजूर, दूध पावडर, लिंबू, साखर असा क्विंटलसाठी एकूण खर्च सहा हजारापर्यंत येतो. एक क्विंटल उत्पादनातून दीड ते दोन हजार रुपये नफा मिळतो. यासाठी कुटुंबीयांना मोठी मेहनत घ्यावी लागते.

अशा तयार होतात साखरगाठी

कढईला उष्णता देऊन यात गरजेनुसार पाणी आणि साखर टाकली जाते. नंतर दूध टाकून ते अधिक शुभ्र आणि चवदार होईल याची काळजी घेतली जाते. चाचणी देऊन या साखरेचे पाणी एका लाकडी साचात दोरे टाकून भरले जाते.

काही वेळाने ते थंड झाले की हे लाकडी साचे वेगळे काढले जातात. यातून साखरेचा पांढरा शुभ्रहार तयार होतो. रंगीबेरंगी गाठीसाठीही कलर टाकून आकर्षक गाठी बनविल्या जातात.

असा आहे हारकडेचा भाव (प्रतिकिलोमध्ये)
होलसेल- ७० ते ७२ रुपये
किरकोळ विक्री - ९५ ते १०० रुपये

"होळी सणासाठी साखरेच्या हारकड्यांना मोठे महत्त्व आहे. पारंपारिक व्यवसाय असल्याने दरवर्षी व्यवसायातून दोन पैसे मिळतात. यातून कुटुंबाला हातभार लागतो." - नशीर शेख, शेमळी, ता.सटाणा

टॅग्स :HoliNashik