
Gas Cylinder Rate Hike : मनमाडला चुलीवर स्वयंपाक करत महिलांकडून निषेध
मनमाड (जि. नाशिक) : घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) किमतीत केंद्र सरकारने भरघोस वाढ करून महिला दिनानिमित्त महिलांना अनोखी भेट दिल्याचा आरोप करीत मनमाड शहर शिवसेना ठाकरे गटातर्फे सिलिंडर आडवे पाडून चुलीवर स्वयंपाक करीत निषेध करण्यात आला.
यावेळी केंद्र राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Protest by Thackeray group to protest against gas cylinder price hike nashik news)
येथील एकात्मता चौकात शिवसेना ठाकरे गटातर्फे चुलीवर स्वयंपाक करण्याचे अनोखे आंदोलन केले. हातात भगवे झेंडे घेऊन शिवसैनिकांनी गळ्यात सिलेंडरचे फलक घातले होते. तर खाली सिलिंडर आडवे करत महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चूल मांडून त्यावर स्वयंपाक करत केंद्र सरकारचा निषेध केला.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत आहे. महागाईने जनता होरपळून निघत असताना केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी तर व्यावसायिक गॅस सिलिंडरमध्ये ३५० रुपयांची वाढ केली आहे. यामुळे घरगुती गॅस सिलिंडर १ हजार १०३ रुपये झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तर व्यावसायिक गॅस सिलिंडर साठी २ हजार ११९ मोजावे लागत असल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहे.
या सर्वांचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत आहे. वाढत्या महागाईने सामान्य नागरिक बेजार झालेला आहे. मात्र, केंद्र सरकार महागाई कमी करण्याऐवजी नेहमी नवे दर जाहीर करून सर्वसामान्यांना धक्का देत आहे. कोरोना नंतर लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडली आहे. यातच गॅसचे दर वाढल्याने हे आंदोलन छेडण्यात करण्यात आले.
हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....
यावेळी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्कप्रमुख प्रवीण नाईक, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, जिल्हा संघटक संजय कटारिया, तालुका संघटक संतोष जगताप, शहरप्रमुख माधव शेलार, आशिष घुगे, सनी फसाटे, लियाकत शेख,
रेणुका जयस्वाल, लीला राऊत, मुक्ता नलावडे, कैलास भाबड, विनय आहेर, प्रमोद पाचोरकर, खालीद शेख, विजय मिश्रा, जावेद मन्सुरी, अनिल दराडे, कैलास गवळी, दिनेश केकान, चंद्रकांत परब, प्रकाश बोधक, अशोक सानप, लक्ष्मण गोसावी, परेश राऊत,अंकुश गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होते
गॅस एजन्सीकडून ग्राहकांची लुबाडणूक...
मनमाड शहरात असलेल्या गॅस एजन्सी कडून गॅस सिलिंडर पोचविण्याच्या नावाखाली सर्रास पैशाची लूट होत असल्याचा आरोप उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद यांनी करत घरपोच सिलिंडरच्या नावाखाली ३० ते ४० रुपये आकारले जातात. पावती मध्ये घरपोच देण्याची जबाबदारी असते मात्र गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांकडून पैशाची लुबाडणूक केली जात असल्याने गॅस कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.